ग्रीक विचारवंत प्लेटो याने समुद्रात बुडालेल्या अटलांटिस या प्राचीन शहर विषयीचा सिद्धांत मांडला होता, तेव्हा त्याला लोकांनी वेड्यात काढले होते. पण कालांतराने त्याचा हा सिद्धांत खरा मानून अटलांटिस शहराचा शोध सुरू झाला. यामुळे अशाच प्रकारचा भारतीय उपमहाद्वीप समूहामध्ये भारत- श्रीलंका या देशांना एकत्रित करणारा कुमारी कंदम नामक समुद्राच्या पाण्याखाली गेलेला भूखंड होता, अन् तो भारत सरकारने शोधावा, असे तामिळ इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, जगात आता सात खंड आहेत. परंतु पूर्वी या सात बरोबरच आफ्रिकेतील मॅडागास्करपासून ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांच्या मध्ये एक मोठा भूखंड होता, जो नंतर समुद्राच्या पाण्याखाली जाऊन त्याच्यासोबत एक प्रगत संस्कृती हरवली. थोडक्यात कुमारी कंदमचं क्षेत्र उत्तरेला कन्याकुमारीपासून पश्चिमेला ऑस्ट्रेलिया आणि पूर्वेला मादागास्करपर्यंत पसरलं होतं. अशा स्थितीत तो आजच्या भारतापेक्षा ३-४ पट मोठा भूभाग असल्याचा त्यांचा अंदाज आहे.
तमिळ साहित्यातील महाकाव्य सिलप्पतिकारम, जे तमिळमधल्या पाच महाकाव्यांपैकी एक आहे, त्यात एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख आहे. दुसऱ्या शतकात लिहिलेल्या या पुस्तकात सांगितलंय की, पांड्य राजांचं हे राज्य समुद्रात बुडालं होतं. यात पहिरुली आणि कुमारी नावाच्या दोन नद्यांचाही उल्लेख आहे, ज्या कदाचित या पाण्यात हरवलेल्या खंडात वाहत असाव्यात. प्राचीन तमिळ कवी आणि विद्वान अडियार्क्कु नल्लार सांगतात की, आजच्या कन्याकुमारीच्या दक्षिणेला एक खंड होता, ज्याची लांबी जवळपास ७०४१ किलोमीटर इतकी होती. अन् त्याचे नाव कुमारी कंदम असं होतं. हे नाव पहिल्यांदा १५ व्या शतकातल्या कंद पुराणम या पुस्तकातून आलं आहे, जे संस्कृतमधील स्कंद पुराणाचं तमिळ स्वरूप आहे. त्यानुसार इथे प्रात नावाचा एक राजा होता, ज्याच्या मुलीचं नाव कुमारी होतं. तिच्या नावावरूनच हे ‘कुमारी कंदम’ असं नाव पडलं. शिवाय इथे कुमारी नावाची नदीही वाहायची, ज्यामुळे हे नाव पडलं असावं.
या खंडाचा उल्लेख फक्त तमिळ पुरातन साहित्यातच नाही, तर एका ब्रिटिश प्राणी शास्त्रज्ञाने सुद्धा केला होता. १८६४ मध्ये, इंग्लंडचा प्राणीशास्त्रज्ञ फिलिप स्क्लेटर याने एक पुस्तक प्रकाशित केलं मॅमल्स ऑफ मॅडागास्कर. हे पुस्तक लिहिण्यासाठी केलेल्या संशोधनात त्याला लक्षात आलं की, मॅडागास्कर आणि भारतातल्या अनेक प्राणी प्रजातींमध्ये थेट संबंध आहे. परंतु मॅडागास्करच्या शेजारी असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये त्यांचा संबंध फारसा दिसत नाही. मॅडागास्करच्या या प्राणी प्रजातींचा संबंध फक्त भारताशी नाही, तर ऑस्ट्रेलियाशीही आहे, जिथे १०० पेक्षा जास्त प्राणी प्रजाती समान आढळतात. अन् आता ऑस्ट्रेलिया तर मॅडागास्करपासून खूप दूरचं बेट आहे. मग भारत, ऑस्ट्रेलिया आणि मॅडागास्करला जोडणारं पुरातन काळात काही तरी असावं म्हणून त्याने हिंद महासागरात एक विशाल खंड होता, जो कन्याकुमारीपासून मॅडागास्कर आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला होता, अशा खंडाची कल्पना मांडून त्याचं नाव ‘लेमुरिया’ ठेवलं. कदाचित श्रीलंकाही लेमुरियाचा भाग असावा. जेव्हा हा ब्रिटिश संशोधक लेमुरियावर संशोधन करत तमिळनाडूत पोहचला, तेव्हा तिथल्या आदिवासी लोकगीतांत त्याला एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख सापडला. यानंतर अनेक तमिळ इतिहासकारांनी लेमुरिया आणि कुमारी कंदम यांच्यातलं संबंध जोडायला सुरुवात केली.
याशिवायकुमारी कुमारी कंदम या खंडाचा उल्लेख भागवत पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण आणि गरुड पुराणातही आहे. फक्त भारतीयच नाही, तर चिनी साहित्यातही याबद्दल माहिती मिळते. चिनी इतिहासात सांगितलंय की, या खंडावर मेरु नावाचा पर्वत होता, जिथून कुमारी, पेरु आणि पहिरुली नद्या वाहायच्या, इथे प्रचंड सोन्याच्या खाणी होत्या. पांड्य राजे या खाणींवर काम करण्यासाठी चीनमधून मजूर आणायचे.
भारताने यावर संशोधनही केलं असून, १४,५०० वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या तुलनेत १०० मीटर खाली होती आणि १० हजार वर्षांपूर्वी ती ६० मीटर खाली होती असे अनुमान काढून श्रीलंकेला जोडणारा भूभाग असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु काही विदेशी शास्त्रज्ञांच्या मते, गोंडवाना नावाचे बेट तुटल्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका तयार झाले आहेत. तसेच आधुनिक विज्ञानातील ‘प्लेट टेक्टॉनिक्स’ च्या सिद्धांतानुसार लेमुरिया खंडाचे अस्तित्व नाकारले आहे !
★ वाल्मिकी रामायणातील युद्धकांडातल्या २२ व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत रामसेनेनं समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन आले आहे. परंतु त्यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. तसेच त्यानुसार, मोठे वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून हजारो वानरांनी समुद्रावर एक कामचलाऊ सेतू बांधला होता. त्यामुळे साहजिकच समुद्रातील तो सेतू काही महिन्यात पूर्णत: नष्ट झाला असेल. परंतु नासाच्या उपग्रहांनी जो सेतूसारखा भूभाग टिपला आहे, तो मात्र नैसर्गिक नसून मानव निर्मितच आहे. अन् त्यातील दगडांच्या कार्बन डेटिंगनुसार त्याचे वय ७००० वर्ष आहे.
