जनगणना

🏠🌳☘️ जनगणना: एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव…🏠👌👌🌹🌹

‘जनगणना’… वरवर पाहता हा केवळ एका सरकारी कर्तव्याचा, कागदपत्रांचा आणि आकड्यांचा खेळ वाटू शकतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष फिल्डवर उतरतो, लोकांच्या घरांचे उंबरठे ओलांडतो, तेव्हा समजते की ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची मोहीम नाही, तर माणसांच्या मनांचा आणि त्यांच्या जगण्याचा घेतलेला एक जिवंत शोध आहे. नुकताच आलेला जनगणनेचा अनुभव माझ्यासाठी केवळ एक शासकीय ड्युटी नव्हता, तर तो एक अत्यंत सुखद, समृद्ध आणि मनाला स्पर्श करून जाणारा अविस्मरणीय प्रवास ठरला.
या मोहिमेदरम्यान समाजाची, माणसांची अनेक रूपे पाहायला मिळाली. काही अनुभव तर थेट काळजाला भिडले. एका भागात फिरताना अशीही काही घरे भेटली जी आकाराने अत्यंत लहान होती. घरे कसली, केवळ पत्र्याचे शेड; भिंत आणि छतही पत्र्याचेच, जेमतेम बसता येईल एवढीच जागा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांची घरे लहान होती, त्यांची मने आभाळाएवढी मोठी निघाली! आपण त्यांच्या दारात गेलो, शासकीय कामासाठी चौकशी करत आहोत हे समजताच त्यांनी घरातली खुर्ची किंवा बसायला बाज दिली. “अहो सर, किती ऊन आहे! एवढ्या उन्हात काय काम करताय? आणि आता तर सुट्टी आहे, तुम्हाला या वर्षी सुट्टी पण नाही! उन्हातून आलाय, आधी पाणी घ्या…” हा त्यांचा आग्रह केवळ औपचारिक नव्हता, त्यात एक जिव्हाळा होता. तांब्याभर पाणी पिऊन खाली ठेवतो तोच, कधी सरबताचा ग्लास तर कधी कोऱ्या चहाचा कप तयार!
अचानक मिळालेला हा प्रेमाचा पाहुणचार पाहून मनात विचार आला – कुठं ही गरिबांमधली खरी माणसं आणि कुठं श्रीमंतीचा दिखावा करणारी, “सर, चहा घेणार का?” असा प्रश्न विचारून मनाचा तोकडेपणा दाखवणारी बेगडी माणसं! कोणी आपल्या शेतातले ताजे आंबे, तर कोणी टपोरी जांभळे आणून पुढ्यात ठेवली. “सर, खावा अगोदर, ही जनगणना होईल उद्या. परत कधी याल आमच्या घरी? आणि तुमच्या मॅडमलाही आवडतात ना जांभळे? ही घ्या. अरे दादा, घे बरं कॅरीबॅग आण इकडे,” आणि हक्काने ताई म्हणाल्या, “उद्याही या सर, ठेवते काढून ताजी जांभळे आणि आंबेही.” हे प्रेम पाहून क्षणभर वाटले, खरंच मी खूप भाग्यवान आहे! एका घरी तर अगदी हक्काने ओल्या भुईमुगाच्या शेंगा भाजून खाऊ घातल्या. त्यांच्या गरिबीतही असलेला हा अमूल्य पाहुणचार पाहून मन भरून आलं. कोणी शेवग्याच्या शेंगा दिल्या, नको नको म्हणालो तरी, “अहो सर, या देशी शेवग्याच्या शेंगा आहेत, बघा खाऊन किती मस्त लागतात!” खरंच, त्यांच्याकडे कदाचित ऐश्वर्य नसेल, पण ‘अतिथी देवो भव’ हा संस्कार त्यांच्या नसानसात भिनलेला दिसला.
याउलट, एक वेगळाच विरोधाभास अनुभवायला मिळाला. आलिशान बंगला आणि पोर्चमध्ये तेवढीच अलिशान मोटारगाडी; पण मोठे बंगले असणाऱ्या काही दारांवर गेलो, तेव्हा तिथली मने मात्र खूप छोटी वाटली. तिथे पाहुणचार तर दूरच, पण साधी चौकशी करतानाही एक प्रकारची अनास्था आणि संकोच जाणवला. दारात उभं करून कोरडेपणाने उत्तरे देणारी, कामात व्यत्यय आल्यासारखे पाहणारी ती माणसे बघून जाणीव झाली की, माणसाचं मोठेपण हे त्याच्या सिमेंट-काँक्रीटच्या वास्तूवरून ठरत नाही, तर त्याच्या छातीत धडकणाऱ्या मनावरून ठरते. एका बाजूला कोल्ड ड्रिंकची बाटली समोर ठेवूनही चेहऱ्यावर नसलेला जिव्हाळा आणि दुसऱ्या बाजूला केवळ तांब्याभर पाणी आणि दोन शेंगा देऊनही चेहऱ्यावर असलेलं तृप्त हसू… हा अनुभव श्रीमंती आणि गरिबीतला खरा फरक सांगून गेला.
काही कुटुंब गरीब असूनही हसती-खेळती आणि नंदनवन भासली. तर काही ठिकाणी मोठे घर असूनही तिथे फक्त एक वृद्ध जोडीच होती. “बाबा, तुम्ही एकटेच राहता का?” “नाही, माझी रुक्मिणी हाय की सोबत.” पॅरालिसिसमुळे थरथरणारे शरीर, बोलतानाही होणारा त्रास, “बाळा, जरा हात देऊन उचल आणि पलंगावर बसव,” म्हणणारे बाबा. बसल्यावर उतारवयात दुखण्याने त्रासल्यामुळे उद्‌विग्नतेने माझ्या प्रश्नाला दिलेली आर्त हाक, “होय, एवढ्या मोठ्या घरात आम्हीच राहतो, आम्हालाच इथे मरायला सोडलंय…” काळजाला चिरून जाणारा तो केवळ आवाज नव्हता, तर ज्या आई-बापाने आयुष्यभर खस्ता खाऊन मुलांना मोठं केलं, त्याच मुलांनी त्यांना एकटे सोडून, आई-बाप आणि मुलांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा तो एक असंवेदनशील आणि भावनाशून्य होत चाललेल्या समाजाचा आरसा होता. काळजाची धडधड अचानक वाढली आणि मनात चर्रकन प्रश्न उभा राहिला, आपल्यावरही उद्या अशी वेळ आली तर? नाही, आपण तरी आपल्या आई-बापाला कधीच अंतर द्यायचे नाही! एक शिक्षक म्हणून, भले माझे विद्यार्थी कमी शिकले तरी चालतील, पण त्यांच्यावर चांगले संस्कार झालेच पाहिजेत, असा निश्चय करून दिलेल्या पाण्याबरोबरच आवंढा गिळला. आणि ॲपमध्ये माहिती भरून मी पुढच्या घराकडे वळलो.
एका घरात तर वयाने थोराड माणूस आणि म्हातारीच दिसली. मी म्हणालो, “सांगा, कुटुंबात एकूण किती व्यक्ती आहेत?” म्हातारी म्हणाली, “दोन.” “आणि बाकीचे कोठे असतात?” “अहो कशाचं काय! अन् फाटक्यात पाय! नशिबाचे भोग,.. पोराकडे एक-दोन एकर शेत हाय, खंडीभर शेळ्या हाईत, पण तरी कोणी पोरगी देईना, काय करावं!” अशाच अनुभवांवरून समजले की, मुलांची लग्नाची वयं निघून गेली आहेत, लग्ने न होणे ही सामाजिक समस्या किती गंभीर बनत चालली आहे! आपल्या शाळेचा पट का कमी होतोय, याचं उत्तरही तिथेच सापडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी, सर कोणत्या तरी कामासाठी गावात फिरतात हे कळल्यावर, मुले कधी मागे फिरायला लागली हे कळलंच नाही. जेव्हा एक ताई म्हणाली, “अहो सर, तुमची शाळेतली सेना काय तुम्हाला एकटं सोडत नाही,” तेव्हा लाल्या म्हणाला, “हं, मग! आम्ही नाही सोडत, आम्ही सरांबरोबरच फिरणार!” शेवटी, “अरे बाळांनो, जा घरी, खूप ऊन आहे,” असे मोठ्या आवाजात रागवल्यावर मुले पांगली. पण थोड्या वेळाने पुन्हा गोळा झाली. त्यांच्याबरोबर केलेली आईस्क्रीम पार्टी, त्या रखरखत्या उन्हात खूपच सुखद, थंडावा देणारी आणि ऊर्जा देणारी होती.
दिवस तिसरा, वेळ दुपारची. एक दारूडा माणूस चिंचेच्या झाडाखाली बसलेला दिसला. मला पाहताच म्हणाला, “ए पोरा, कसलं ऊन हाय! जरा बस सावलीत, मग काम कर.” मी म्हणालो, “नाही, खूप काम आहे,” त्याच्यापासून सुटका करून घ्यावी म्हणून मी वेगाने चालू लागलो, तर स्वारी नागोबासारखी डुलत-डुलत मागे आली आणि हाताला धरून ओढतच मला चिंचेच्या गार सावलीत बसविले. मीही मग थोडा वेळ विसावा घेतला, पण विचार करू लागलो, ज्या माणसातला माणूस जिवंत असतो तोच खरा माणूस! दारूडा असूनही त्यात एक प्रेमळ माणूस लपलेला असू शकतो, याची जाणीव झाली.
“आम्हाला घरकुल येत नाही, नळाचे पाणी मिळत नाही, काहीच सुविधा मिळत नाहीत,” म्हणून शासनाला शिव्या देणारा हतबल म्हातारा पाहिल्यावर वाटले, कल्याणकारी राज्य आणि लोकशाही फक्त पुस्तकात अभ्यासाच्याच गोष्टी असाव्यात का? सामान्य जनतेशी त्याचा काही संबंध नसावा? पुन्हा मी निशब्द झालो… “रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ, गड्या. पाऊल थकलं न्हाई, गड्या…” गुणगुणत मी चालू लागलो. काही अनुभवांनी डोळ्यांच्या कडा ओलावल्या, तर बरंच काही ओठांवर हास्य आणि आपल्यावर भरभरून प्रेम देणारी माणसे डोळ्यासमोर येऊ लागली….खरंच, खूप सारे चांगले अनुभव आहेत, पण काही अनुभव शब्दांच्या चौकटीत मांडता येत नाहीत, ते फक्त अनुभवायचेच असतात.
या संपूर्ण प्रवासात नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेचाच वरचष्मा राहिला. बहुतांश लोकांनी अत्यंत आदराने आणि आपुलकीने या मोहिमेत सहकार्य केले. जनगणना संपली आहे, कागदपत्रे जमा होतील, आकडेवारी सरकारी दप्तरी नोंदवली जाईल. पण या निमित्ताने माणसांच्या मनाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांची जी नोंद माझ्या हृदयाच्या पानावर झाली आहे, ती आयुष्यभर पुसली जाणार नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीत नाही, तर त्याच्यातील माणूसकीत आहे, हे शिकवणारा हा जनगणनेचा प्रवास माझ्यासाठी खरोखरच एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव ठरला!
🖋️ मंगेश नकाते

Leave a comment