भक्ताला फोन आला देवाचा

भक्ताला फोन आला देवाचा–जगदीश काबरे

भाग–१

[रात्रीच्या एका विचित्र शांततेत, अचानक मोबाईल वाजतो… स्क्रीनवर लिहिलंय — “CALLING: GOD”]

भक्त (थोडा चकीत, थोडा खोचक): हॅलो? कोण बोलतोय?

देव: मी… ज्याला काही लोक ‘अल्ला’ म्हणतात, काही ‘गॉड’, काही ‘ईश्वर’, ‘शिव’, ‘राम’, ‘ख्रिस्त’, ‘बुद्ध’… तू मला कुठल्या नावाने ओळखतोस?

भक्त (सावधपणे): माझे मित्र कधी तुला ‘परमशक्ती’, कधी ‘विश्वचेतना’ असे म्हणतात. पण खरं सांगायचं तर मी तुझ्यावर फारसा विश्वास ठेवत नाही.

देव (हसत): अगदी योग्य आहे. कारण आंधळा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा. आणि मी त्या अंधश्रद्धेच्याच विरोधात तुझ्याशी बोलण्यासाठी फोन केला आहे.

भक्त (आश्चर्याने): म्हणजे? हे तर उलटंच झालं! बहुतेक लोक मला म्हणतात की, तुझ्यावर श्रद्धा ठेव. व्रतवैकल्ये कर, देवळात जा, पूजा करा, देव्हारा माजव, श्राध्द, अभिषेक, एकादशीचे उपवास वगैरे, म्हणजे देव तुझ्यावर प्रसन्न होईल. पण आता तर तू अचानक माझ्याशी बोलायला आलास?

देव (थोडा गंभीर होत): कधी विचार केलास का, हे सगळं कोणी सुरू केलं? मी स्वतः कधीतरी हे सगळे कर्मकांड करायला सांगितलं का तुम्हाला?

भक्त: आम्ही ऐकत आलो की, धर्मग्रंथात लिहिलंय. आमचे पूर्वज करत आलेत. तुम्हीच आदेश दिलेत असं ते म्हणतात.

देव: मी “माणूस हो” एवढंच सांगितलं होतं. पण माणसांनी त्या गोष्टींची यंत्रणा केली, पूजाविधी, संस्कार, कर्मकांड यांची यादी तयार केली. आता त्याच यादीचे गुलाम झाले आहेत ते…

भक्त : पण पूजा, व्रतं, श्राध्द वगैरे सगळं तर आत्म्याच्या शांतीसाठी करायचं असतं नाही का?

देव: मी कधी सांगितलं की, एखाद्याचं श्राध्द केलंत तरच त्याचा आत्मा शांत होईल? मृत व्यक्तीचं स्मरण ठेवायचं असेल, तर त्याची आठवण ठेवण्यासाठी त्याच्या चांगल्या गोष्टी जीवनात आचरणात आण. पण मेलेल्या माणसाला तूप-भात दाखवून आत्मा तृप्त होतो म्हणणं हे श्रद्धेचं रूप नाही, ती अंधश्रद्धा आहे.

भक्त (थोडा चिडून): मग लाखो लोक जे करत आहेत, ते सगळं चुकीचं आहे ना?

देव: चुकीचं आणि दिशाहीनही आहे. श्रद्धेच्या नावाखाली भीती विकणारे धर्माचे दलाल तुमचं शोषण करत असतात. “हे नाही केलंत तर पाप लागेल” अशी भाषा माझी नाही. ती धर्माच्या बाजारीकरणात जन्मलेली आहे.

भक्त: म्हणजे उपवास, पूजाअर्चा, संकल्प, होमहवन, व्रते — या गोष्टींना काहीच अर्थ नाही?

देव: काही गोष्टींत मानसिक शांती देण्याचं कार्य असू शकतं — म्हणजे उपवासाने शरीराला आराम मिळतो, ध्यानात मन शांत होतं. पण या क्रियांचा उपयोग फक्त साधन म्हणून झाला पाहिजे, साध्य म्हणून नाही. जर एखादा विधी केल्यावर तुझ्या अहंकाराला बळ मिळत असेल — “मी करतोते आणि तेच खरं”, तर ती कृती माझ्याशी संबंधित नसते, ती कृती तुझ्या अहंकाराशी जोडलेली असते.

भक्त (गोंधळून): मग देव्हारा ठेवू नये का नये घरी? तो श्रद्धेचा भाग नाही का?

देव: तो श्रद्धेचा भाग नाहीच. कारण ती तर एक ‘प्रतिमा-आधारित पूजनाची सवय’ आहे. तुझं मन जर स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या ऊर्जेशी जोडलेलं असेल तर तुला एखाद्या फोटो, मूर्ती वा घंटानादाची गरजच काय? तुझं जगणं जर अंतर्मनातून होत असेल, तर ते कोणत्याही बाह्य रचनेशिवाय अनुभवता येते… नव्हे तसं अनुभवता आलं पाहिजे.

भक्त: पण लोक म्हणतात की, ही कर्मकांडे संस्कृतीचाच भाग आहेत म्हणून.

देव: मला सांग, संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे ‘सजगतेने जपलेली मानवी मूल्यं’. पण जी गोष्ट मूल्य न राखता फक्त नियम म्हणून उरते, ती परंपरा नसते — ती अंधपरंपरा होते आणि अशा अंधपरंपरांचे पालन केल्याने समाज मागे जातो, पुढे नाही.

भक्त: पण आमच्याकडे एखादा पूजारी म्हणतो की, अमुक एक व्रत केले की, तुमच्या सात पिढ्यांचे उद्धार होतील, या व्रताने. मग त्याचं काय?

देव (हसून): तो तुमचं भय तुम्हालाच विकत असतो आणि स्वतःचं पोट भरतो. मी कोणाच्याही पिढ्यांच्या उद्धाराची ठेकेदारी पुजाऱ्याला दिलेली नाही. जर पिढ्यांचा उद्धार करायचा असेल, तर सर्वांना शिक्षण द्या, विज्ञान शिकवा, विवेक जागवा, प्रेमाने वागा. हे केलं तर पुढच्या सात नव्हे, सत्तर पिढ्या घडतील.

भक्त: मग तू खरंच अस्तित्वात आहेस का?

देव (गंभीर होत): मी ‘असणं’ आहे. तू मला शोधतोयस फॉर्ममध्ये — मूर्ती, पूजा, विधी. मी आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयात. म्हणूनच तुमचे गाडगे बाबा सांगत होते, ’देवळात देव नसते देवळात पुजाऱ्याचे ते पोट असते. तुम्ही माणसात देव पहा.’

भक्त (गहिवरून): मग श्रद्धा असावी की असावी?

देव: श्रद्धा म्हणजे डोळे झाकून एखादी गोष्ट मानणं नव्हे. श्रद्धा म्हणजे डोळे उघडून, विचार करून, अनुभव घेऊन मिळालेली जाणीव. खरं तर त्याला विश्वास म्हणायला हवं. ही जाणीव तुला हे सांगते की, तू ह्या निसर्गाचा एक भाग आहेस. त्याला मूर्ती, विधी, चमत्कार, बाजारपेठ यांची कसलीही गरज नाही. म्हणून यापुढे लक्षात ठेव, ज्या ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. कारण त्या खोट्या आहेत हे कळले तरी आपण बदलत नाही. त्याच त्या गोष्टी प्रवाहपतीताप्रमाणे करत राहतो. पण विश्वास मात्र चुकीच्या गोष्टी कळल्यावर बदलण्यास तयार होतो. म्हणून श्रद्धा नाही तर विश्वास ठेव.

भक्त (शांत होतो): मग मी उद्यापासून वेगळं काय करावं?

देव: काही सोड, काही पाळ असं मी कधीच सांगत नाही. पण जे काही करतोस, त्यामागे भीती नको, प्रेम असावं. जे काही पाळतोस, त्यामागे अंधश्रद्धा नको, वैज्ञानिक जाणिव असावी. जे काही करतोस, त्यामागे अडाणी श्रद्धा नको, चिकित्सक विवेक असावा.

[फोन अचानक कट होतो. भक्त डोळे उघडतो. अंधारात एक शांत प्रकाश. त्या प्रकाशात त्याच्या मनात एक विचार घोंगावतोय — “श्रद्धा नाही विश्वास ठेव. डोळे उघडे ठेव आणि डोक्यात प्रश्न उद्भवू दे, म्हणजे अंधश्रद्धा नष्ट होतील.”]

Leave a comment