नांगर

गुटो, दातो, नांगर, जगाल, ईशाड, जुपनी, डिमरी … रूमणी, कासरो, मुसक्या, जु, येसन, मांगर,— ही नावे केवळ साधने नव्हेत. ही एक परंपरा आहे, एक वारसा आहे, एक संस्कृतीचे प्रतीक आहेत. शेतकरी, त्याचा वडिलोपार्जित वारसा असलेल्या या साधनांद्वारा जमिनीत जीवन ओतत असें. नांगर जमिनीत घुसवला की एक नवा चरा (वरो, तास) तयार होत असें एक नवा श्वास, एक नवे अंकुर.

जु : बैलांच्या मानेवर ठेवण्यात येणारे साधारणतः 4/5 फुट लांब आणि 4/5 इंच जाड दोन्ही टोकास निमूळता असा लाकडी ओंडका किंवा कनकी चा तुकडा. त्याला दोन्ही बाजूनं छिद्र करून बैल बांधण्यासाठी लावलेली दोरी. त्याला जुपण्या असे म्हणतात.

ईशाड : साधारण 6/7 फूट लांब आणि 3/4 इंच रुंद अशी एक लाकडी पट्टी जिच्या टोकाकडे 10/12 इंच जागा सोडून जाडीच्या बाजूने तिरकस आणि 2/3 इंच खोल अश्या खाचा मारलेल्या असतात.

रूमणी: नांगरणीसाठी आवश्यक असलेली एक लाकडी अवजार. ज्या मुळे नांगरावर आणि बैलांवर नियंत्रण ठेवणे सोपं होत. इंग्लिश L या अक्षरा सारखे.

नांगर: बैलांच्या साहाय्याने जमीन खाणण्यासाठी के साधन असत त्यांना नांगर म्हणतात.

या साधनांमध्ये एक कौशल्य असें, एक कारागिरी असें. त्यांची निर्मिती करताना सुतार कामगाराचा घाम असें. एक एक साधन परंपरा, कौटुंबिक ज्ञान, अनुभवान्सोबत एकरूप झालें असें.

काळ बदलला — तंत्रज्ञान आले, नवीन साधने आली. ट्रॅक्टरने नांगरणी सुरु केली, हरवेस्टरने पिके कापली. शेतकरी म्हणू लागला — एकट्या माणसाने जेवढे काम केले असें, त्याच्या शंभर पटीने एक मशीन करू लागले.

मशिन्सने शेतकऱ्याचा परिश्रम वाचवला, वेळ वाचवला. एके काळी एक शेत नांगरण्यासाठी दोन बैलांची गरज असें — आता एक ट्रॅक्टर एकाच वेळेत अनेक एकर नांगरू शकतो. एक हरवेस्टर शेकडो माणसांचे काम एकटाच करू शकतो.

या बदलाचा शेतकरीने स्वीकार केला, परंपरा अधिक असलेल्या साधनांवरील विश्वास त्याने हरवला. एक एक करून ही साधने घरांमधून गायब झाली. जी साधने एके काळी घराचा एक भाग असें, घराचा गर्भ असें, ही सगळ्या साधनाना ओसारी ला बलाटा मध्ये किंवा घरात एक विशेष जागा असे ती आता नष्ट झाली आहेत.

परंपरा हरवण्यात एक वेदनादायी भाग असतो. एक अस्सल वारसा हरवतो. नांगर ओढणे, मुसक्यात जनावर बांधणे, जगाल बसवणे ही कौशल्ये कुठे शिकवली जात नाही. या कौशल्यांमध्ये एक शेतकरी असलेल्या माणसाचा गर्व असें — त्याचा परंपरेशी असलेल्या नाळेशी.

गुटो, दातो, नांगर, जगाल, ईशाड, जुपनी, डिमरी … ही नावे आता बोलीभाषेतदेखील हरवू लागली आहेत. भविष्यात शाळांमध्ये त्यांची ओळख करून दिली जाईल कि नाही माहित नाही. घरांमध्ये वडिलांकडून मुलांपर्यंत ही कौशल्ये दिली जात नाहीत. कारण साधनंच दिसली नाहीत तर मुलगा तरी कसा विचारेल “पप्पा याला काय बोलतात”?
एक एक साधन हरवतानाच एक एक परंपरा हरवते — एक एक बोली हरवते — एक एक अनुभवही हरवतात.

संस्कृतीचे मुळं जिथे असतात जमिनीत तिथे एक असंतुलन निर्मित होत आहे. ही असंतुलन नंतर भाषेपर्यंत, चालीरीतीपर्यंत, एकात्मतेपर्यंत पसरत जाते.

आपण म्हणतो — भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. परंतू भाषा ही एकटी टिकू शकत नाही. भाषेशी एकरूप असलेल्या चालीरीती, कौशल्ये, साधने जर हरवली तर भाषेत वापरत असलेले शब्द ही हरवून बसूच आणि त्याने भाषा अधिक पोकळ होऊन जाईल.

गुटो, जु, नांगर… या नावांमध्ये एक एक अनुभव असतात. बैल जेव्हा नांगर ओढतात. हिरी फाफारी, हियो या शब्दांसोबत जोतकरी आणि बैल यांच्यामध्ये असणारी ही भाषा म्हणजे ही एकात्मता हरवण्यात एक खोल असंतुलन तयार होईल.

लेखन : अमित चाळके..
फोटो : विस्मृतीच्या उंबठ्यावर पुस्तकातून…

Leave a comment