एकदा मी कोल्हापूर ला जात असताना माझ्या बस मधे माझ्याच बाजूच्या सीट वर एक गृहस्थ येऊन बसले , इस्लामपूर ला जायचं होतं त्यांना , नव्वद टक्के पांढरे झालेल्या दाट कुरळ्या केसांचा छानसा भांग पाडला होता त्यांनी , व्हेजिटेबल ऑईल लावल्याने त्यांच्या केसांवर किंचित हिरवट छटा आली होती , मेन्टेन केलेल्या बॉडी वर इन केलेला साधा कॉटन चा पांढरा शर्ट , नीटनेटकी ब्राऊन कलर ची कौड्रा पँट , काळ्या जाड फ्रेम चा चष्मा ..…!
एकूणच ह्या वयातही देखणे म्हणावे असे स्मार्ट सिनियर सिटिझन वाटत होते ते , त्यांनी त्यांची ओळख करुन दिल्यावर माझ्या लक्षात आलं आपण ह्यांना पेपरमधे , टीव्ही वर बघितलंय कधीतरी , कुठल्यातरी मोठ्या मेकॅनिकल कंपनी चे मालक होते ते ..! मला आठवलं , मी नकळत बोलून गेलो …
ओ माय गॉड , मी ऐकलंय तुमचं नाव , हाय्येस्ट इन्कमटॅक्स पेयर आहात आज तुम्ही पुण्यातले , राईट..? ठाऊक आहे मला ..!
पण तुम्ही ..? अन् ह्या बस मधे ..? त्यावर ते थोडे संकोचल्या सारखे झाले अन् म्हणे…
” हो , मला सर्व सामान्य माणसां सारखंच रहायला मनापासून आवडतं , बस स्टँड वरच्या गर्दीत आणि बस मधे माझा जास्त छान टाईम पास होतो , एअपोर्टवरच्या गर्दीत मला ती मजा येत नाही , बस मधली लोकं कशी आपल्यातली वाटतात मला ..!
ट्रेन चा प्रवास सुध्दा मला आवडतो , नाही असं नाही , पण तोही मी नॉन एसी बोगीतून करतो , खिडकीच्या बंद काचा , त्याही पडद्यांनी झाकलेल्या एसी बोगीत माझा जीव घुसमटतो..! खिडकीच्या काचा उघडून बाहेर प्लॅटफॉर्म वर चाललेली लोकांची धांदल बघत बसण्यात अजूनही रमतो मी ..! लोक कसं कसं आपलं आयुष्य जगत असतात हे तिथेच कळतं मला ..!
गप्पा मारायची आवड असावी बहुतेक साहेबांना , पूर्ण चार तासांच्या प्रवासात छान संवाद झाला आमच्यात , त्यातील त्यांनी त्यांच्या विषयी जे बरंच काही सांगितलं , जे मला भावलं त्याचा सारांश सांगतो …!
” गरिबीत वाढलोय मी , मध्यमवर्गीयात साहजिकच मी जास्त रुळतो , आपले वाटतात ते , जास्त कंफर्टेबलही मी त्यांच्यातच असतो , मोकळं बोलायला मला आवडतं..!
मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्स मधल्या पार्ट्या मी अव्हॉइड करतो , मला तिथल्या त्या कृत्रिम फॉरमॅलिटीज जमतही नाहीत अन् आवडतही नाहीत , मी समोरच्याला टाळी देत मोठं तोंड उघडुन , पोटातून खदखदा हसणाऱ्यांपैकी आहे , मिटलेल्या ओठांनी छोटंसं औपचारिक स्माईल मी देऊ शकत नाही
विनाकारण पैसा उधळणं मला आवडत नाही , ज्या गोष्टीं शिवाय अडत नाही त्या गोष्टी मी कधी घेत नाही , काटकसरी आहे मी , पण कंजूस नाही , लहान असल्या पासून सवयच पडली आहे काटकसरीची..! गरिबीत वाढल्याने पैशाची किंमत आहे मला त्यामुळे आता जरी मुबलक पैसा आहे गाठीशी तरी तो उगीच खर्च करणं मला जमत नाही ..!
दोघेच असतो आम्ही घरी , छोटासा सुंदर 2 BHK फ्लॅट आहे पुण्यातल्या कोथरूडात जिथून दिवसभर बाहेरची वर्दळ दिसते ..! अशा मार्केट जवळील गजबजलेल्या वस्तीतच खूप आवडतं आम्हाला रहायला , सतत समोर लोकांची लगबग दिसायला हवी , ती दिसत राहिली की अंगात आळस भरत नाही , काम करत राहण्याची स्फूर्ती मिळते , उत्साह वाटतो..!
दोन मुलं होती आम्हाला , स्कूलबस च्या ॲक्सीडेंट मधे दोघेही गेलीत , कुठेतरी दूर शांत निवांत जागी जाऊन रहावं असं वाटतंच नाही आता आम्हा दोघांनाही , शांततेत करमत नाही , मन उदास होतं..!
माझ्याकडे चार चार गाड्या नाहीत , माझे कामगार म्हणतात साहेब आता घ्याल तर एक छान मोठी गाडी घ्या , मी म्हणतो अरे आम्ही दोघेच आहोत , मोठी गाडी घेऊन काय करू..? उलट ह्या पेक्षा छोटी मिळाली तर ती घेणं पसंत करीन मी , पुण्याचा ट्रॅफिक बघितला ना..? इथे गाडी जितकी छोटी तितकी बरी , सहज पार्क करता येईल अशी…!
एक अल्टो च आहे माझ्याकडे , आज ही मी ड्रायव्हर ला घेऊन माझ्या अल्टो ने त्याच्या बाजूला बसून एकटा जाऊ शकलो असतो पण त्याला बोलण्यात गुंतवण बरोबर नाही , अन् दूरच्या प्रवासात चार तास शांत बसणं मला जमणार नाही , सगळ्यां बरोबर सर्वसामान्यां सारखंच आयुष्य जगायला आवडतं मला ..!
गाड्यावर वडापाव खायला आवडतो , टपरी वरचा कटिंग चहा प्यायला आवडतो पण त्या ग्रीन टी च्या नादी मी लागत नाही ..!
मला साधी राहणी आवडते हो , तुम्हाला सांगतो माझ्या कपाटात दोन चार शर्ट पँटस् जरी प्रेस केलेल्या दिसल्या तरी मला पुरेशा वाटतात , टाय सूट नाही माझ्याकडे , नाही आवडत घालायला , उगीच आणून काय करायचा , माझ्या स्वतः साठी कपड्यांच्या दुकानात मी कधी गेलो नाही , कोणाबरोबर गेलोही तरी आवडलं म्हणून कुठलं एखादं शर्ट घेतलं असं कधी झालं नाही , एकतर मला गरजही नाही आणि आवडही नाही..!
शूज , घड्याळं , जॅकेट्स , स्वेटर्स , मोबाईल्स आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या मी वापरतोय त्या खराब झाल्याशिवाय मी दुसऱ्या घेत नाही कधी ..!
पुण्यात एकटाच कुठे जाणार असलो तर ओला ऑटोच मी जास्त प्रिफर करतो , ऑटो ने ट्रॅफिक मधून लवकर जाता येतं शिवाय डोक्याला पार्किंग ची चिंता रहात नाही , गचके बसतात पण ठीक आहे , त्याचीही सवय हवी , मला माझ्या जीवाचे नसते लाड करून घ्यायला आवडत नाहीत , थोड्या अंतरा साठी मी कार मधे एसी लावत नाही , लहानपणी भरपूर उन्हाळे अंगावर घेतले आहेत मी , उकाडा सहन करायची सवय मोडू द्यायची नाहीये मला..!
पाचव्या मजल्या पर्यंत कोणाकडे जायचे असेल तर मी लिफ्ट वापरत नाही , जिन्यानी चढून जातो , ते म्हणतात अरे एवढं धापा टाकत येण्याची काय गरज होती ..? लिफ्ट होती ना , मी म्हणतो सवय आहे हो मला जिने चढायची आणि त्या निमित्ताने गुडग्यांना व्यायाम होतो ना माझ्या..!
अजब वाटत होतं मला हे सगळं ऐकतांना , लोकं पैशाच्या मागे का लागतात तर त्यांचे शान शौक पुरे करून घ्यायला , पुढचं आयुष्य ऐशोआरामात घालवायला , मौज लुटत जगायला , स्वतः च्या श्रीमंती चे प्रदर्शन करत नकळत चेहऱ्यावर श्रीमंतीचा अहंकार ओढून घ्यायला पण हे एकदमच वेगळे वाटले , हे पैशाच्या मागे नाहीत , म्हणूनच कदाचित पैसा ह्यांच्या मागे येत असावा..! एव्हढा पैसा असून अगदी साधे , निगर्वी , चार चौघांसारखे , जनरल पब्लिक मधे वावरणारे , रमणारे , भरपूर गप्पा मारणारे असे आहेत ते ..!
विचारलं सहज काय काम काढलं होतं इस्लामपूरला ..?
” काही नाही , इथे पण माझ्या पुण्यातल्या फॅक्टरी चं एक छोटं युनिट आहे ज्यात पाचशे कामगार आहेत , मी कामगारांना दिवाळीची भेट म्हणून दर वर्षी प्रत्येकी एक लाखाचा चेक देत असतो , तेवढ्यासाठी मी नं येता हे काम मी माझ्या स्टाफला सांगूनही करु शकलो असतो पण ते मला माझ्या हातानीच करायचं असतं , त्यांच्या हाती चेक सोपवतांना त्या बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलून येणारी खुषी मला बघायची असते , बस ती खुषी बघून त्या बदल्यात मला जे खूपसारे समाधान मिळते ते घेऊन मी परत जातो , माझ्यासाठी त्यांच्याकडून मिळालेली हीच सगळ्यात मोठी गिफ्ट असते..! “
इस्लामपूर दहा मिंटांवर आलं होतं , त्यांनी खिडकीतून हात बाहेर काढत मला साधारण दोन फर्लांगावर दिसणारी त्यांची फॅक्टरी दाखवली , पुढे जवळच पेठ नाक्यावर बस थांबली तेंव्हा ते उठले , खांद्यावर सॅक अडकवली , माझ्याशी हात मिळवून आमची पुण्याची फॅक्टरी बघायला या नक्की म्हणून निमंत्रण देऊन ते उतरले..! दिसेपर्यंत झपाझप चालत चाललेले ते मी पाठमोरे बघत होतो..!
स्वतः काटकसरीने राहून आपल्या गरीब कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी बस ने येऊन त्यांना तब्बल पाच करोड सारखी मोठी रक्कम सहज वाटून निघून जाणारे असेही लोक असतात हे मला माहीत नव्हतं ..!
एकतर ह्यासाठी मन फार मोठं असावं लागत किंवा मोह कशाचाच अजिबात नसावा लागतो..!
एका असामान्य व्यक्तीची योगायोगाने भेट झाल्याने फार छान वाटले..!
त्यांच्या बोलण्याने मी इतका प्रभावित झालो होतो की प्रवासातले माझे चार तास कसे गेले कळलं पण नाही..!
इस्लामपुर हून पुढे कोल्हापूर एक तास मात्र फार कंटाळवाणा गेला , अजून खूप ऐकुन घ्यायचं होतं मला त्यांच्याकडून , फार मिस केलं मी त्यांना ..!
~डॉ संजय जहागीरदार
