मराठी बोला

नक्की वाचा आणि विचार करा….आपली जबाबदारी ओळखा👇
आपणच मराठी बोलत नाही… सर्व भाषा ह्या तोलामोलाच्याच असतात त्यामुळे कोणत्याही भाषेचा तिरस्कार करणे अथवा कोणत्याही भाषेबद्दल गैर बोलणे वा गैरसमज पसरवणे मुळातच चुकीचे आहे. याचा अर्थ आपण आपल्या मातृभाषेकडे कानाडोळा करणे असा होत नाही. परंतु, सध्या आपल्या मायमराठीत इतर भाषांची वाढलेली लुडबूड पाहता आपली मातृभाषा धोक्याच्या वळणावर असल्याचे पदोपदी जाणवते. मराठी भाषा तशी खूप जुनी नसली तरी नवीन आहे असंही नाही. दहाव्या अकराव्या शतकातही मराठी भाषा चांगल्याप्रकारे रूढ होती असे वारंवार वाचनात येते म्हणजे निदान आपल्या तेरा चौदा पिढ्यांच्या तरी वापरात मराठी भाषा निश्चित आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मराठी साहित्य एक समृद्ध साहित्य म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वापारपासून अनेक साहित्यिक आपली भाषा संवर्धनासाठी, टिकण्यासाठी, वृध्दींगत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वास्तविक पाहता हे कार्य आपणा सर्वांचे आहे. आपण सगळे आपली मातृभाषा संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एका सर्वेक्षणानुसार मराठी भाषा बोलणाऱ्यांची एकूण संख्या ९ कोटीहून अधिक आहे. मराठी ही जगातील १५ वी व भारतातील ४थी भाषा आहे. परंतु असे असूनही मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही ही खेदाची बाब मराठी भाषिकांच्या मनात खदखदत आहे. सध्याचा काळ परिवर्तनाचा आहे. परिवर्तनाशिवाय विकास शक्य नाही आणि म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण मराठी भाषिक मनापासून रान पेटवले पाहिजे अन्यथा अखिल जगात बोलली जाणारी ही भाषा स्वताच्या देशात मात्र अभिजात दर्जेपासून वंचितच राहील. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण आपली भाषा आपली दैनंदिन गरज बनवली पाहिजे. कांही दिवसांपूर्वी हंम्पीला जाण्याचा योग आला होता तेव्हांची घटना आहे. होस्पेट- हंपी एस.टी. बसमधून आम्ही खाली उतरलो, बसच्या दाराला लागूनच अनेक रिक्षावाले थांबले होते. उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हंपी दर्शन करायचे का? म्हणून विचारत, योग्य भाडे ठरवून प्रवाशांना नेत होते. तसे आम्हीही उतरलो तसं एक रिक्षावाला आमच्या समोर आला, "साहेब....हंपी दर्शन करणार का?" असं स्पष्ट मराठीत बोलला. दोन दिवस सातत्याने कन्नडमध्ये वार्तालाप केल्याने मी त्याला कानडीतच होकार दर्शवला व योग्य भाडे ठरवून हंपी दर्शनासाठी निघालो. तो रिक्षावाला मराठीतच बोलत होता याची मला जाणीव झाली व सहज गप्पा सुरू झाल्या. मी विचारले, "तुम्ही महाराष्ट्रातले का? चांगलच मराठी बोलता आहात म्हणून विचारतोय?" तो म्हणाला, "नाही हो साहेब, मी इथलाच आहे, माझे वडीलही इथलेच आणि आजोबाही इथलेच बरं का!" "मग तुम्ही एवढे स्पष्ट मराठी कसं काय बोलता? आणि घरातही मराठीच बोलता का?" माझ्या या प्रश्नाला तो उत्तर देण्यासाठी तोंड उघडला आणि मी ऐकतच राहिलो, "साहेब आम्ही मुळातच कर्नाटकातले त्यामुळे घरी मराठी कसं बोलणार? परंतू रिक्षा व्यवसायावरच आमचं पोट आहे आणि इथे येणाऱ्या पर्यटकांतील ५०-६०% पर्यटक मराठी बोलणारेच असतात त्यामुळे मराठी बोलावे लागते त्यामुळे आम्ही मराठी भाषा आत्मसात केली. लिहिता वाचता येत नाही परंतु, बोलता येते. माझे वडील, आजोबांनाही येते मराठी घरच्या महिलांना मात्र येत नाही. माझा मुलगा जरी या व्यवसायात आला तरी त्याला मराठी शिकावंच लागणार आहे ना!" तो आणखी बरेच काही सांगत होता पण मला विचारांची तंद्री लागली, "खरंच आपण आपली मातृभाषा मराठी असताना आपण बोलताना संकोच करतो आणि हा रिक्षावाला कन्नड भाषिक असतानाही उत्तम मराठी बोलतो, माहिती सांगतो, आदराने वागतो आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करतो आणि आपण मात्र 'यांच्यासारख्यांमुळेच मराठी भाषा लोप पावत आहे.' असं बोलत अशा अमराठी माणसांवरती खापर फोडतो. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहराबरोबरच लहान सहान शहरातही अमराठी भाषिक लोकांचे वास्तव्य वाढले आहे त्यामुळे मराठी भाषेवर अमराठी संस्काराचे प्रमाणही वाढले आहे. महाराष्ट्र वा मराठी भाषेची ओळख करून देताना सह्याद्रीच्या रांगडेपणा दाखवायचे आणि मराठी हलवायाच्या दुकानासमोरच मांडलेल्या अमराठी हलवायाच्या दुकानातून मिठाई खरेदी करायचे हे कितपत योग्य आहे? बोलण्यातच नव्हे तर वागण्यातही मराठी असणे कधीही सरसच! मराठी सोडून इतर भाषेत आपण गुरफटत चाललो आहोत हेच खरं. राजस्थानी हलवाई महाराष्ट्रात स्थिरावले, मराठी आत्मसात केले परंतु आपण मात्र त्याच्या दुकानात जाऊन "रसगुल्ला कैसा दिया?" म्हणून अभिमानाने विचारतो! "रसगुल्ला कसं दिलास?" स्पष्टपणे मराठीत बोलायला आपल्याला लाज वाटते ही शरमेची बाब आहे. तुम्ही त्याच्याशी मराठीत बोला तो ही मराठीतच तुम्हाला उत्तर देईल! पण त्यासाठी आपली मानसिकता हवी ना! माझ्याच बाबतीत घडलेला प्रसंगच पहा ना! परवा एका मिठाईच्या दुकानात मी गेलो, ठरवलं आज मराठीतच बोलून पाहूया. "उपवासाचं काय आहे?" हलवाई म्हटलं, "साबुवडा है, डिंकलड्डू है....." मी म्हटलं, "पाव किलो कसं दिलं?" "पैसष्ठ रूपये ढाई ग्रॅम है साहब!" तो बोलला. आणखी काही पदार्थ घेऊन त्याला "एकूण किती झाले?" विचारले तर तो म्हटला, "दोनशे साठ रूपये..." तो चक्क मराठीत बोलला. तो त्याच्याच भाषेत बोलत होता आणि मी मराठीतच बोलत होतो. त्याच्या वारंवार अमराठी बोलण्याला मी नाईलाज समजून त्याच्या भाषेत बोलत नव्हतो शेवटी त्याच्या तोंडून मराठी शब्द बाहेर पडलेच ना! याचा आनंद व समाधानाच्या आविर्भावात एकूण रक्कम देऊन मी घराकडे निघालो. स्वत:चे व कुटुंबाच्या चरितार्थासाठी अमराठी लोक मराठी भाषा आत्मसात करतात आणि आपण मराठी भाषिक असूनही अमराठी अभिमानाने बोलतो. एखाद्या अमराठी भाषिक हलवायाच्या दुकानात जाऊन आपणच, "भैय्या जामून कैसा दिया?" अगदी उर फुटेपर्यंत त्याच्याशी अमराठी भाषेत बोलत राहतो. मुळातच जामून हा महाराष्ट्रीयन मिठाई "गुलाबजामून" परंतू आपण त्या हलवायाच्या भाषेत बोलून "जामून" करून टाकला आहे. तो हलवाई इथे व्यवसाय करतो. म्हणजे त्याला चांगलं मराठी येत असणार परंतु, आपणच मराठी बोलत नाही...म्हणजे त्याला काय गरज मराठीत संवाद साधण्याची? त्याला त्याची भाषा प्रियच असणारं ना! पण आपण मात्र आपली मानसिकता बदलत नाही त्याचे काय? आपली मराठी भाषा खूप गोड आहे हो! बोलायला आणि ऐकायलाही! दोन वर्षांपूर्वीचा नेपाळधला एक प्रसंग आठवला.. पोखऱ्याहून लुंबीनीला जाताना एक हॉटेल लागले भूक लागल्याने बसमधून सगळेच उतरले. हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यासाठी काय घ्यावे काय नको चर्चा सुरू झाली. तसं तर नेपाळमध्ये खायचे प्यायचे खूप वांदे होतात. सात आठ दिवसाचे अनुभव पाठीशी होतेच ना! चर्चा सुरू असतानाच एक आवाज आला, "वरण भात घ्या साहेब..... महाराष्ट्राचा फेवरेट डिश..." मागे वळून पाहिले तर गल्ल्यावरून मालकाचा आवाज होता. तो आमच्या जवळ आला राठीतच नमस्कार करत बोलू लागला, "मी पुण्याचाच आहे, स्वारगेटला घर आहे माझं. नेपाळ फिरायला आलो. सहजच व्यवसाय टाकलं आणि इथंच स्थायिक झालो. दोन चार वर्षांत मराठी ऐकायलाच नाही आले. अहोभाग्य आज मराठी मातीची सेवा करण्याची संधी मिळाली..." भरपेट वरण भात खाऊन मराठीत ढेकर देऊन आम्ही निघालो. भारतात नव्हे तर परदेशातली माणसं मराठी बोलायला तरसलेली आहेत आणि इथं स्व-राज्यात मात्र मराठीची दशा पाहवत नाही. आपण मराठीत बोलत असताना बरेच अमराठी शब्द बोलत असतो. किंबहुना ते शब्द मराठीत रूळले आहेत. इंग्रजी भाषेतील शब्दांचा तर मराठीत भरमारच आहे. हे शब्द जणू "कानामागून आली अन् तिखट झाली." म्हणीप्रमाणे रूळलेले आहेत. परंतु, आजच्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी बोलताना मराठीतल्याच शब्दांचा वापर करण्यासाठी श्रीगणेशा करायला हरकत नाही!

आनंद घोडके, सोलापूर
anandaghodake@gmail.com

Leave a comment