सेफ्टी pin चा इतिहास

मित्र-मैत्रिणींनो, सेफ्टी पिनचा वापर अनेकदा करावा लागतो . लहानपणी याच सेफ्टी पिननं तुमच्या आईनं शर्टाला रुमाल बांधलेला असेल. आत्ताही शर्टचं बटन तुटलं किंवा ड्रेसवर ओढणी नीट बसवायची असेल तर सेफ्टी पिन तुम्ही वापरत असालच. चला, आज या सेफ्टी पिनची माहिती बघू या.

Safety Pin

‘सेफ्टी’साठीची खास ‘पिन

सेफ्टी पिनचा जन्म कसा झाला?

सेफ्टी पिनचा शोध लावला तो वॉल्टर हंट या अवलियानं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी तो प्रसिद्ध होता. असं म्हणतात की, वॉल्टर हंट याच्यावर खूप मोठं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी तो एखाद्या नवीन गोष्टीच्या शोधात होता. एखादी नवीन गोष्ट विकसित करायची आणि त्याच्या विक्रीतून पैसे कमवून कर्जफेड करण्याचा त्याचा विचार होता. यातूनच त्यानं सेफ्टी पिनची निर्मिती केली. असंही सांगितलं जातं की, त्याच्या पत्नीच्या ड्रेसचं बटण तुटलं होतं, त्या वेळी त्यानं एका तारेचा वापर करून बटणाची गरज भागवली. यानंतर त्यानं तारेपासून ही सेफ्टी पिन बनवली, ज्याला ड्रेस पिन असं म्हटलं जात असे. वॉल्टर हंटच्या लक्षात आलं, की ही छोटीशी गोष्ट अत्यंत उपयुक्त आहे, तेव्हा त्यानं या पिनसाठी घेतलेलं पेटंट चारशे डॉलर्सना विकलं. याच वॉल्टर हंटनं सेफ्टी पिनसह पेन, चाकूला धार करण्याचे उपकरण, स्पिनर अशा विविध गोष्टींचा शोध लावला. शिलाई मशीनही त्यानंच तयार केलं.

सेफ्टी पिन नाव कशामुळे?

सेफ्टी पिन हे नाव कशामुळे पडलं? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. त्या तुलनेनं सेफ म्हणजे सुरक्षित असतात म्हणून. म्हणजे बघा, तुमच्या शर्टाचं बटण तुटल्यावर तिथं टाचणी लावली, तर ती कधीही टोचण्याची, रक्त येण्याची शक्यता असते. मात्र, सेफ्टी पिनमध्ये तिच्या विशिष्ट रचनेमुळे तिचं जे टोक असतं ते सुरक्षित आवरणात झाकलं जातं, शिवाय ते निघण्याचीही शक्यता कमी असते.

चुंबकांना चिकटण्याची क्षमता

सेफ्टी पिन्स ज्या गोष्टींपासून तयार केल्या जातात, त्यांच्यामध्ये लोखंड हासुद्धा एक घटक असतो. त्याच्याबरोबरच ब्रास आणि स्टेनलेस स्टील यांचाही वापर केला जातो. सेफ्ट पिन्समध्ये लोखंडाचाही समावेस लोहचुंबकाला चिकटतात.

लहान मुलांसाठी वेगळ्या पिन्स : सेफ्टी पिन्स लहान मुलांसाठी, बाळासाठी वापराव्या लागतात. त्यांची रचना आणखी सुरक्षित प्रकारची असते. या पिन्सचे बेबी पिन्स, नॅपी पिन्स, डायपर पिन्स असे प्रकार असतात.

विविध देशांत विविध दृष्टिकोन

सेफ्टी पिन्सकडे विविध देशांमध्ये विविध दृष्टिकोनांमधून बघितले जाते. भारतात पूर्वी सेफ्टी पिन्स हा महिलांसाठी जणू काही खजिना असायचा आणि लग्नात इतर वस्तूंबरोबर वधूला सेफ्टी पिन्स दिल्या जायच्या. युक्रेनमध्ये सेफ्टी पिन्स असुरी शक्तींना पळवतात असा प्रवाद होता, म्हणून लहान मुलांच्या कपड्यांना सेफ्टी पिन्स लावण्याची पद्धत होती. अनेक देशांत सेफ्टी पिन्समुळे नशीब सुधारतं अशीही मान्यता आहे.

सेफ्टी पिन डे

सेफ्टी पिनच्या नावानं चक्क एक दिवस साजरा केला जातो. आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरं आहे. दर वर्षी दहा एप्रिल हा दिवस जगभरात ‘सेफ्टी पिन डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी वॉल्टर हंट यांनी सेफ्टी पिनचं पेटंट घेतलं होतं. त्यांचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

Leave a comment