नवे शिक्षण नवे शिक्षक 1.0

नवे शिक्षण, नवे शिक्षक

भाग :-01

विद्यार्थी जन्मत:च अंकीय साक्षर (Digital Litarate) आहेत, शिक्षक अंकीय साक्षर हवेत. शिक्षक नवा झाला तर शिक्षण नवे होणार

‘नवे शिक्षण, नवे शिक्षक’ हे पुस्तक मी ‘जडण-घडण’ मासिक, पुणेमध्ये सन २०१४ ला ‘नवे शिक्षण’ व सन २०१५ ला ‘नवे शिक्षक’ सदरात प्रामुख्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह होय. शिवाय, या पुस्तकात याच काळात लिहिलेले शिक्षणविषयक काही अन्य लेखही आहेत. ते विविध शैक्षणिक संस्थांच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकांसाठी म्हणून लिहिलेले होते. यात शिक्षक दिनाच्या अनुषंगाने लिहिलेलेही काही लेख आहेत. यापूर्वी माझे ‘एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. माझे तरुण संपादक मित्र डॉ. सागर देशपांडे यांचे व अन्य मित्र, सहकारी यांच्या शिक्षण प्रेमामुळे हे लेखन प्रामुख्याने घडले. काही लेखन शिक्षणविषयक दिवाळी वार्षिकांसाठीही झाले आहे.
मी २००५ ते २०१० या काळात महावीर महाविद्यालय, कोल्हापूरचा प्राचार्य होतो. आमच्या महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांबरोबर स्वतंत्र अशी अध्यापक शिक्षण (शिक्षणशास्त्र/शिक्षक प्रशिक्षण) विद्याशाखा होती, या शाखेमार्फत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची मान्यता असलेला बी.ए;बी.एड्. हा एकात्मिक अभ्यासक्रम चालत असे. स्वतः मी सन १९६७ ते १९७१ या कालखंडात श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी येथून डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) हा बी.ए:बी.एड्. समकक्ष एकात्मिक अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊन माध्यमिक शाळेत शिक्षक झालो होतो. सन १९७१ ते १९७९ अशी आठ वर्षे मी विविध माध्यमिक शाळात हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र, कार्यानुभव इत्यादी विषयांचे अध्यापन केले. नंतर सन १९७९ ते २०१० अशी ३१ वर्षे हिंदीचे अध्यापन केले. याच काळात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पदव्युत्तर अध्यापन केंद्रात एम.ए., एम्.फिल., पीएच्.डी. अभ्यासक्रमांसाठी मानद अध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले. सन २००५ ते २०१० या कालखंडात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आमच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राचा प्रमुख होतो, तिथे ही बी.ए., बी.कॉम., शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांचे एम्.फिल्. अभ्यासक्रम आम्ही चालवत होतो. या काळात शिवाजी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातील बाल शिक्षणास मी मार्गदर्शन करत असे. बालवाडी ते पदव्युत्तर अशा सर्वस्तरावरील अध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवातून शिक्षणविषयक माझे काही एक आकलन तयार झाले आहे. सन १९९० ते २०१६ या कालखंडात मी फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया, स्विट्झर्लंड, लक्झेंबर्ग, व्हॅटिकन, जपान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँगसारख्या देशांना राष्ट्रीय आदान-प्रदान कार्यक्रम व शिष्टमंडळातून भेटी दिल्या, युरोपला तर मी दीर्घकाळ होतो. या काळातही मी तेथील शिक्षण संस्था, शाळा, विद्यापीठे, प्रशिक्षण केंद्रे यांना भेटी देत तेथील शिक्षण व्यवस्था जवळून अभ्यासली आहे.
मधल्या काळात निवृत्तीनंतर एका बृहत् संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीने दिलेला सुमारे दहा लक्ष रुपयांच्या अनुदानातून मी ‘हिंदी वेब साहित्य’ वर संशोधन केले. महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याच्या काळात महाविद्यालयाच्या प्रशासनात ई-गव्हर्नन्स यशस्वी केले होते. ग्रंथालयाचे संगणकीकरण, कॉम्प्युटर लॅबसारखे प्रकल्प पूर्ण केले होते. त्या सर्वांतून माहिती तंत्रज्ञानाशी संपर्क व सहवास लाभला होता. या विविध परिदृष्यांतून जागतिक शिक्षणाचे जे माझे आकलन तयार झाले होते, त्या तुलनेत मी सतत भारतीय शिक्षणाची तुलना करत होतो. शिक्षणविषयक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल मी वाचत राहिलो आहे, वेगवेगळ्या शिक्षण व शिक्षकविषयक प्रश्न व समस्यांवर इंटरनेटवर उपलब्ध अद्यतन माहिती, लेख, लिंक्स, पीडीएफ्स, पीपीटी, क्लिप्स, इ. वाचत, पाहात नि ऐकत आलो आहे. भाषाविषयक सॉफ्टवेअर्स हाताळली आहेत. शिक्षणविषयक अध्यापन साधने, ब्लॉग्ज, ऍपस् अनुभवत वेबसाईटस् मी पाहिल्या, वाचल्या. विविध विद्यापीठ व संस्थांचे ऑनलाईन अभ्यासक्रम पाहिले. या सर्वांतून माझ्या लक्षात आलेल्या गोष्टीपैकी महत्त्वाची गोष्ट ही की जागतिक माहिती तंत्रज्ञानाची गती आणि आपले शिक्षण यात मोठे अंतर आहे. आपण बदलतो हे खरे असले, तरी विकासाच्या घोडदौडीपुढे आपले बदल कासव गतीचेच ठरतात. (खरं तर गोगलगाईच्या गतीचेच ! अन् जगाची तर गती गुगलची आहे !) जग दरवर्षी अभ्यासक्रम बदलत असताना, आपण आपले अभ्यासक्रम दशकाने बदलतो. विद्यापीठे तीन एक वर्षांनी आपले अभ्यासक्रम बदलतात. पण त्यात मूलभूत बदल होत नाहीत. ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ असं त्या बदलाचं रूप असतं. आज तर स्थिती अशी आहे की विद्यार्थी Digital Natives आहेत, तर शिक्षक Digital Migrants. शिक्षक संगणक साक्षर आहेत, परंतु आधुनिक तंत्र साधनांचा वापर करीत नाहीत. खिशातील मोबाईलचा शैक्षणिक साधन म्हणून करण्याची मानसिकता नाही. नव साधन व तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या ऊर्जा व उत्साहाच्या अभावी विद्यार्थी व शिक्षकांतील दरी रुंदावते आहे. आपण कालबाह्य गोष्टी शिकवत वेळ आणि पैसा वाया घालवतो. शिवाय पिढीला जीवनोपयोगी शिक्षण व कौशल्य न दिल्याने बेरोजगार व अकुशल मनुष्यबळाची पैदास आज तेजीत आहे.
वरील रोगाचे मूळ आपल्या अध्यापक शिक्षणात (Teacher Education) आहे. डी.एड्., बी.एड्., एम.एड्., अभ्यासक्रमविषयक धोरण ठरविणारी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) आहे, तीच अकार्यक्षम व भ्रष्ट राहिल्याने व तिने जगाचे बदल न स्वीकारल्याने आपल्या शिक्षणाची खरी दुर्गती झाली आहे. न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल स्वीकारून आपण अध्यापक शिक्षणात सुधारणा केल्या असत्या तरी काही एक बदल झाले असते, पण देशातील शिक्षणाचे सूत्रधार (संस्था चालक), राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने सरकार त्यांचे हितसंबंध जपत आले आहे. शासन अनुदानित विद्यापीठे व महाविद्यालये स्वायतत्तेचा फायदा घेऊन कात टाकत आहेत, असे चित्र नाही. उलटपक्षी अन्य खासगी वा विदेशी संस्था वा विद्यापीठांच्या तुलनेत ते मागेच दिसतात. नॅकचा दर्जा भौतिक संपन्नता द्योतक आहे. तो बौद्धिक मूल्यमापन करतो, पण ते मुल्यमापन संरचनात्मक (Framed) आहे. संशोधनाचा दर्जा सुमार असून प्रकाशने तकलादू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले एकही विद्यापीठ नसणे, हा त्याचा पुरावा. या पुस्तकातील लेख शिक्षण व शिक्षक विकासाचा आग्रह धरते. मला हा देश म्हणजे ‘गया बीता’ वाटत नाही. येथील शिक्षण व शिक्षक जागतिक दर्जाचे असावे असे वाटते. गुणात्मक शिक्षण हे प्रयोग, संशोधनातून उदयाला येते. त्याला फार कमी वाव आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे, या ग्रंथातील ‘नवे शिक्षण’ विभागात बालवाडी ते विद्यापीठीय शिक्षणाच्या प्रत्येक स्तराचे विवेचन आहे. शिवाय अध्यापक शिक्षणावरही विचार करण्यात आला आहे. स्त्री शिक्षणाचा ऊहापोह आहे, तसेच शिक्षणाच्या वाढत्या व्यावसायीकरणावर चिंता व्यक्त करून काही उपायही सुचविण्यात आले आहेत. तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा आग्रह अशासाठी की आपले आजचे मौखिक शिक्षण क्रियात्मक व विद्यार्थी सहभागी करून घेणारे व्हावे. कारण त्याशिवाय ज्ञानरचनावाद यशस्वी होणार नाही. भारतीय शिक्षणावर होणाऱ्या जागतिकीकरणाचे परिणाम विशद करून चक्रव्यूह भेदण्याचे आवाहन या पुस्तकात करण्यात आले आहे.
‘नवे शिक्षण’ हे ‘नवे शिक्षक’ घडले तरच यशस्वी होणार, हे लक्षात घेऊन दुसऱ्या भागातील अकरा लेखांतून नव शिक्षकाच्या बदलत्या पात्रता, साधने, कौशल्ये, उपक्रमशीलता, अंकीय साक्षरता (Digital Literacy) , नवी अध्यापन पद्धती (New Pedagogy) ३० बाबत पारंपरिकेस छेद देणारे आग्रह आहेत. नवा प्रशिक्षित होणारा शिक्षक अजून गुंडाळी फळाच वापरणार असेल तर त्याच्या हाती लॅपटॉप येणार केव्हा? स्लाईड प्रोजेक्टर जाऊन अध्यापक महाविद्यालयात थ्रीडी तंत्रज्ञान, फोरजी, जीपीएस, व्हर्च्युअल एज्युकेशन, ऑनलाईन अभ्यासक्रम आल्याशिवाय शिक्षक आधुनिक बनणार कसा? अजून अध्यापक महाविद्यालयातील मेथड मास्टर जर लेसन नोटमध्येच अडकून असतील तर ते ‘One Note’ तंत्रज्ञान केव्हा वापरणार? असा प्रश्न आहे. ब्लॉग्ज, लिंक्स, सॉफ्टवेअर, विकीज, प्लॅटफॉर्म, फोरम, ऍनिमेशन, व्हिडिओज या तर झाल्या सामान्य गोष्टी. ‘नवशिक्षकाची अंकीय साक्षरता’ लेखात जी आधुनिक साधने स्पष्ट केली आहेत, ती किती अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षक अध्यापक, प्राध्यापकांना माहीत आहेत? ती ते स्वतः वापरतात काय? मग प्रशिक्षकांना ती साधने अवगत होणार. अशा अंगांनी आपण अध्यापक शिक्षणाकडे पाहायला हवे. शिक्षणात गुणवत्ता येण्याचे महाद्वार म्हणजे अध्यापक शिक्षण अत्याधुनिक असणे होय, याचा आपणाला विसर पडता नये. यासाठी सिंगापूरसारखा देश आपला आदर्श व्हायला हवा. फिनलंडसारखा छोटा देश जागतिक क्रमवारीत अव्वल असतो, तर आपण खंडप्राय असून का नाही? असा भुंगा आपल्या कानात सतत घोंगावला पाहिजे. हॉर्वर्ड विद्यापीठ जागतिक दर्जात वर्षांनुवर्षे अव्वल का राहते? असा प्रश्न जोवर आपणास बेचैन करून कृतिशील करणार नाही, तोवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आपणाकडे निर्माण होणार नाही.
सदर पुस्तकात संदर्भ शोध, चित्रे इत्यादी साहाय्याबद्दल मी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. डॉ. रवींद्र मिरजकर, प्रा डॉ. श्रद्धा पाटील, प्रा सुरेश संकपाळ या माझ्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूरमधील पूर्व सहकाऱ्यांचा ऋणी आहे. तद्वतच हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल अक्षर दालन, कोल्हापूरचे अमेय जोशी यांचाही मी मन:पूर्वक आभारी आहे.

मूळ लेखक :-
डॉ. सुनीलकुमार लवटे

संकलन :-
लक्ष्मण काटेकर, सोलापूर

क्रमश……
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

Leave a comment