माणुसकी
लगीन अर्थात लग्न…
{१९८०-९० च्या दशकातील जिवंत संस्कृती} `शिवश्री लक्ष्मण काटेकर` *7588020886*

१९८०–९० चं दशक म्हणजे आजच्या भाषेत “सुवर्णकाळ” म्हणावा असा काळ.
त्या काळात गरीबी होती, साधनं कमी होती, पैसा कमी होता; पण माणसांच्या मनातला “जिव्हाळा” अफाट होता.
घरं मातीची होती, पण नाती सोन्यासारखी होती.
भाकरी कोरडी असली तरी ती प्रेमाने फुललेली होती.
आणि लग्न…!
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा, दोन गावांचा, दोन भावविश्वांचा उत्सव असायचा.
आजच्या काळात लग्न म्हणजे “इव्हेंट” झाला आहे;
पण त्या काळात लग्न म्हणजे “माणुसकीचा सोहळा” होता.
घर बांधण्यापासूनच लग्नाची सुरुवात होत असे…
त्या काळात एक गोष्ट खूप महत्वाची मानली जायची —
“आपलं घर असावं.”
ते दोन खोल्यांचं असो, मातीचं असो, कौलारू असो; पण स्वतःचं असावं.
कारण लग्न म्हणजे फक्त संसाराची सुरुवात नव्हती, तर “घराचा मान” होता.
लग्न ठरलं की घरासमोरची जागा पाहिली जायची.
जमिनीवरचे दगड, काटेकुटे, माती, गवत सगळं हाताने साफ केलं जायचं.
आजसारखी JCB, पोकलेन, ट्रॅक्टर नव्हते.
तेव्हा खोरे, फावडे, पाटी, घमेलं हीच यंत्रं होती.
गावातील तरुण मंडळी सकाळपासून घाम गाळत उभी राहत.
कोणी माती उचलत, कोणी दगड बाजूला करत, कोणी काटे गोळा करत.
आणि हे करताना कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा.
कारण ते “काम” नव्हतं…
तो “आपलेपणा” होता.
त्या काळात दारातली बाभूळही तोडली जात नव्हती.
काटे असले तरी तिची सावली उपयोगी आहे हा विचार लोकांच्या मनात होता.
आज झाडं तोडून सजावट केली जाते;
तेव्हा झाडांच्या सावलीतच संसार उभे राहत होते.
विना मोबदला मदतीला धावणारी माणसं…
त्या काळातील सर्वात मोठी श्रीमंती कोणती असेल तर ती म्हणजे —
“हाक मारली की धावून येणारी माणसं.”
आज कामासाठी मजूर शोधावे लागतात.
तेव्हा गावचं गाव कामाला उभं राहत होतं.
“उद्या अमुक घरात लग्नाचं काम आहे”
इतकं ऐकलं की सकाळी लोक स्वतःहून यायचे.
कोणी बांबू आणत,
कोणी मंडपासाठी कडबा आणत,
कोणी पाणी भरत,
कोणी चूल मांडत,
कोणी भांडी घासत.
ह्या कामाला ना पैशाचा व्यवहार होता ना अपेक्षा.
कारण प्रत्येकाला माहिती होतं —
“आज त्यांचं… उद्या आपलं…”
हीच खरी “गावकी” होती.
बस्ता बांधणे — एक सामाजिक सोहळा
आज ऑनलाइन ऑर्डर देऊन कपडे येतात.
पण त्या काळात “बस्ता बांधणे” हा स्वतःमध्ये एक मोठा कार्यक्रम असायचा.
संपूर्ण भावकी, नातेवाईक, मित्रमंडळी असे जवळपास शंभर लोक गावातून शहरात जात.
बैलगाड्या, एसटी, ट्रक… जे मिळेल त्याने लोक निघत.
दुकानात गेल्यावर तासन् तास चर्चा चालायची.
“हा रंग चांगला दिसेल…”
“ही साडी वरमाईला शोभेल…”
“नवरदेवाला पांढरं धोतर भारी दिसतं…”
त्या काळात नवरा-नवरी एकमेकांना पाहणंही कठीण होतं.
चेहरा बघणं तर दूरच;
पण तरी संसार आयुष्यभर टिकत होते.
कारण नातं चेहऱ्यावर नव्हे तर संस्कारांवर उभं होतं.
टेलरची कमाल कला…
त्या काळात रेडिमेड कपडे नव्हते.
प्रत्येक कपडा शिवून तयार होत असे.
गावातला टेलर म्हणजे कलाकार असायचा.
त्याच्याकडे कापडांची पोती पोती पडलेली असत.
माप नसतानाही तो अचूक कपडे शिवायचा.
लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचा अंदाज त्याला असायचा.
त्याच्या मशीनचा “टकटक… टकटक…” आवाज म्हणजे लग्न जवळ आल्याची चाहूल असायची.
रात्रभर कंदिलाच्या उजेडात तो कपडे शिवत बसायचा.
त्याच्या घामातही एक समाधान असायचं —
“आपल्या हाताने कुणाचं लग्न उजळतंय…”
महिलांचं श्रमदान — घराचा खरा आधार
लग्न म्हटलं की घरातील पुरुष बाहेरची कामं करत;
पण घराच्या आत खरी धुरा सांभाळायच्या त्या महिला.
शेजारच्या बायका स्वतःची कामं सोडून मदतीला यायच्या.
कोणी धान्य निवडत,
कोणी मसाले भाजत,
कोणी पापड लाटत,
कोणी गूळ कुटत.
दळणासाठी बैलगाडी भरून गिरणीत जाणं हा वेगळाच अनुभव असायचा.
दिवसभर तिथे बसून धान्य दळलं जायचं.
परत आल्यावर ते चाळण्यासाठी पुन्हा महिला मंडळ जमायचं.
गप्पा, ओव्या, हसणं, टोमणे, आठवणी…
सगळ्या वातावरणात एक जिवंतपणा असायचा.
त्या काळात “कॅटरिंग” नव्हतं;
पण प्रत्येक पदार्थात प्रेमाचा स्वाद होता.
गावातील दुकानांवरचा विश्वास
आज मोठमोठ्या मॉलमध्ये खरेदी होते.
पण तेव्हा गावातील किराणा दुकान म्हणजे नात्याचं केंद्र होतं.
दुकानदार उधारीवर सामान द्यायचा.
कारण त्याला माहिती होतं —
“ह्यांचं लग्न आहे… पैसे नंतर देतील.”
त्या व्यवहारात कागदपत्र नव्हती, सही नव्हती, स्टॅम्प नव्हते.
फक्त “विश्वास” होता.
आज नोटा वाढल्या;
पण विश्वास हरवला.
गडंगड जेवण — प्रेमाचा मान
लग्न ठरलं की नवरा-नवरीला त्यांच्या गावातील लोक जेवायला बोलवायचे.
त्याला “गडंगड जेवण” म्हणत.
सकाळ, दुपार, संध्याकाळ…
कुठे ना कुठे आमंत्रण असायचं.
घरात काय असेल ते प्रेमाने वाढलं जायचं.
गुळवणी पूरण पोळी, भाकरी, पिठलं, भात, आमटी…
पण त्या जेवणात आत्मीयता असायची.
आज पंचतारांकित हॉटेलमध्येही जी चव मिळत नाही,
ती त्या साध्या जेवणात होती.
वरमाई आणि वरबाप — सन्मानाची ओळख
लग्न जवळ आलं की नवरानवरीचे आई-वडील “वरमाई” आणि “वरबाप” म्हणून ओळखले जायचे.
त्यांचा थाटच वेगळा असायचा.
गावात त्यांना विशेष मान मिळायचा.
घरात येणारा प्रत्येक पाहुणा त्यांचा आदर करत असे.
त्यांच्या चेहऱ्यावर जबाबदारी असायची;
पण त्याचबरोबर एक समाधानही असायचं.
लग्नपत्रिका आणि न्हावी {वारिक } समाजाची जबाबदारी
त्या काळात लग्नपत्रिका छापणंही मोठं काम होतं.
गावात थोडाफार शिकलेला मुलगा महत्वाचा मानला जायचा.
तो नावे लिहायचा, मजकूर तयार करायचा.
चुका व्हायच्या; पण कोणी रागावत नव्हतं.
कारण प्रत्येकजण समजून घेत होता.
गावातील न्हावी वारिक बंधू कडे पत्रिका वाटायचा. त्याच्यावर जबाबदारी दिली जात असे.
तो प्रत्येक घरात जाऊन निमंत्रण देत असे.
नातेवाईकांना मात्र स्वतः जाऊन पत्रिका द्यायची पद्धत होती.
कारण आमंत्रण म्हणजे फक्त कागद नव्हता;
तो प्रेमाचा मान होता.
लग्न होई पर्यंत ती पत्रिका जपून ठेवली जात. तिला फाडू देत नव्हते. कारण पत्रिका फाटली तर लग्न मोडेल असा सकारात्मक संदेश वजा समज त्यातून दिली जात असे.
बैलगाड्यांचा प्रवास…
लग्नाला परगावी जायचं म्हणजे बैलगाड्यांचं नियोजन सुरू व्हायचं.
प्रत्येक जण आपली बैलगाडी सजवून ठेवत असे.
गाडीत गाद्या, चटया, उशा टाकल्या जात.
रात्री चांदण्याखाली बैलगाड्यांची रांग निघायची.
बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आणि लोकांच्या गप्पा…
तो प्रवास म्हणजेच आनंद होता.
आज गाड्या वेगवान झाल्या;
पण प्रवासातील माणुसकी हरवली.
बांगड्या, हळद आणि देवकार्य…
महिलांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असायचा.
सगळं गाव त्यात सहभागी होत असे.
हळद दळताना ओव्या म्हटल्या जायच्या.
त्या ओव्यांत संस्कृती होती, विनोद होता, प्रेम होतं.
रांजण, उंबरा, देवघरातील देव…
सगळ्यांची पूजा केली जायची.
त्याला “देवकार्य” म्हणत.
कारण त्या काळात प्रत्येक शुभकार्य देवाच्या आशीर्वादानेच सुरू होत असे.
वाडवडिलांच्या समाधीचं दर्शन
नवरा-नवरी आपल्या गावातील देवदेवतांचे दर्शन घेत.
वाडवडिलांच्या समाधीपाशी जाऊन नमस्कार करत.
आजच्या पिढीला कदाचित हे जुनं वाटेल;
पण त्या कृतीत “कृतज्ञता” होती.
“आपण जे आहोत ते त्यांच्या मुळे…”
हा भाव मनात होता.
गुळपोळ्यांची तेलच्या शिदोरी…
गुळपोळ्या बनवण्याचा कार्यक्रम म्हणजे महिलांचा उत्सव असायचा.त्यालाच तेलच्या असं म्हणलं जायच
मोठमोठ्या तव्यांवर पोळ्या भाजल्या जायच्या.
त्यांचा सुगंध सगळ्या वाडीत पसरायचा.
त्या पोळ्या पंधरा दिवस टिकत.
ना फ्रीज होता ना डबे;
पण अन्नात शुद्धता होती.
बेसन-भाकरीतला प्रेमाचा स्वाद
कामाला आलेल्या लोकांना घरचंच जेवण दिलं जायचं —
बेसन, भाकरी, कांदा.
पण त्या साध्या जेवणातही आत्मीयता होती.
कोणी तक्रार करत नव्हतं.
कारण लोक पोटासाठी नव्हे,
“नात्यासाठी” काम करत होते.
त्या काळात माणुसकी जगत होती…
त्या काळात दगाबाजी कमी होती.
चोरी कमी होती.
लबाडी कमी होती.
लोक गरीब होते;
पण मनाने श्रीमंत होते.
घरांचे दरवाजे बंद नसत,
मनांचे दरवाजे उघडे असत.
“आपलं” हा शब्द जास्त होता,
“माझं” हा शब्द कमी होता.
आज पैसा आहे, साधनं आहेत, सुविधा आहेत;
पण माणूस एकटा पडला आहे.
त्या काळात मात्र अडचणीत संपूर्ण गाव उभं राहत होतं.
आजही आठवणींच्या ओंजळीत जपलेला काळ…
आज जेव्हा जुनी माणसं त्या काळाच्या आठवणी सांगतात,
तेव्हा त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं.
कारण त्यांनी फक्त लग्न पाहिलं नाही…
तर “माणुसकीचा उत्सव” जगला आहे.
आज DJ आहे, लाईट आहे, महागडे कपडे आहेत,
पण त्या काळातील आत्मीयता नाही.
आज फोटो हजारो आहेत;
पण आठवणी कमी आहेत.
तेव्हा फोटो कमी होते;
पण प्रत्येक क्षण मनात कोरला जायचा.
१९८०–९० च्या दशकातील लग्न म्हणजे केवळ परंपरा नव्हती.
ती एक “जिवंत संस्कृती” होती.
जिथे श्रमदान होतं…
विश्वास होता…
माणुसकी होती…
आपुलकी होती…
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे —
“एकमेकांसाठी जगण्याची वृत्ती” होती.
आज काळ बदलला, साधनं बदलली, जग बदललं…
पण त्या काळातील आठवणी अजूनही गावच्या वाऱ्यासारख्या मनाला स्पर्श करून जातात.
कारण…
त्या काळात लग्न होत नव्हतं…
तर “नाती जोडली” जात होती.
पुढील भागात भेटू - लग्नापूर्वीचे दोन दिवस ह्या विषयावर
शब्दांकन –शिवश्री लक्ष्मण काटेकर
16पूर7588020886
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳