साकव
“साकव” हाच शब्द आमच्या विभागातून हद्दपार झालाय .आम्ही ज्या वेळी शाळेत जायचो त्या वेळी आमच्यासाठी महत्त्वाचे साधन होते साकव. पावसाचे ४ महिने ज्याच्या भोवती आमचे दैनंदिन जीवन फिरायचे तो म्हणजे आमचा “साकव ” याच साकवाची अनुभूती सांगणारी ही अनुभव कथा “साकव”.

मे महिन्याची सुरुवात झाली की साकव बांधायचे वेध लागायचे.मग वाडीतले करते सवरते पुरुष मंडळी विचारविनिमय करून गावकारांशी सल्ला मसलत करून पूर्ण वाडीची बैठक लावत.या बैठकीत वाडीचा गावकर मुख्य असायचा.गावकर रयतेला सांगायचा आपल्याला साकवाचे काम हाती घ्यावे लागणार आहे. मग मे १५ नंतरचे २ दिवस ठरवले जायचे .तो पर्यंत वळीवाच्या पावसाची सुरुवात होयची.मग साकव बांधायचा दिवस उजाडायचा.घरटी एक गडी आणी आम्ही चिली पिली पोरे या प्रमाणे माणसे जमायची .मग मुख्य कामाला सुरुवात होयची.काही लोक कणकीचे (मोठे बांबू) तोडायचे, कोण दगडीत नेम (खड्डा)करायचे. कोण साकवाला लागणारे कोंडे आणि खांब (मेंडके) शोधायला जायचे .कांदळ वन जवळ असल्यामुळे चिपयचे खांब आणले जायचे कारण ते कुठल्याही पुरात ,पाण्यात तग धरून राहू शकत.एवढे साहित्य आल्या च्या नंतर साकव बांधायला सुरुवात होयची.कोंडे (बांबू) च्या ३/३.५ फुटाच्या छोट्या छोट्या तुकड्यांना कणकीच्या वाश्यानवर चूक आणि सुम्ब च्या मदतीने बांधले जायचे.आधारासाठी काठीच बांधली जायची त्यामुळे माणसांना साकव पार करणे सोपे जायचे असा तयार होत असे साकव.
जून जुलै चा मुसळधार पाऊस, या पावसामुळे पर्या (वाहाळ) छोटा मोठा पूर येत असे.हा पूर पायी पार करणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच असे. आमचे सर्व दैनिक व्यवहार बाजूच्या गावाशी(देवाचे गोठणे) निगडित होते शाळे पासून ते अगदी दुकान बाकी पर्यंत.आजही काही आठवणी ताज्या आहेत आम्ही ५/६ वीत असू त्यावेळची गोष्ट अशीच एक जून जुलै ची सकाळ नेहमी प्रमाणे शाळेत गेलो पाऊस सुरू होता जसा रिमझिम रिमझिम .कोकणातला रिमझिम पाऊस, कधी रुद्र रूप धारण करेल हे त्या निसर्गालाही माहीत नसेल.आम्ही शाळेत गेलो नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले आणि बातमी आली मारवेली चा साकव पुरात वाहून गेला. आम्हाला शाळेतून घरी सोडण्यात आले पण मोठा प्रश्न होता पर्या पार कसा करायचा ? साकव तर वाहून गेला होता पूर तर जोरदार होता पाण्यात उतरणे तर अशक्यच होते.आमची राहायची व्यवस्था केरावळे,राघव वाडीत झाली. पूर काय ओसरायचे नाव घेत नव्हता. जिथे साकव बांधला जायचा तेथेच खाडी आणि पर्या चा संगम आहे.या खाडी ला पण सुकती होती त्यामुळे तिथे ही उतार होयची शक्यता नव्हती, कारण सुकतीमुळे पूराच्या पाण्याचा जोर जास्त होता.४ तासानेच भरती येणार होती तर होडी किंवा पाण्यात उतरून पोहून आम्हाला आमच्या घरी जायला भेटणार होते.आमचा इकडे तर पालकांचा जीव तिकडे मेटाकुटीला आला होता,दोघाचीही भेट होणे गरजेचे होते. शेवटी ५/६ वाजता भरती आली. वाडीमध्ये सिताराम किरंजे यांची एकमेव होडी होती. त्या होडीतून आम्ही या तडीतून त्या तडीवर आलो. मुलांची पालकांची भेट झाली.मग पुढचे २ दिवस सुट्टी मिळाली जो पर्यंत साकव बांधून होणार नव्हता.
याच साकवावरून पर्या ला आलेला हाऊर बघणे.याच साकवावर दंगा मस्ती पण होई .कोण किती साकवा वरून जोरात पळतय,कोण जास्त साकवाला जोर जोरात हलवताय सर्व गोष्टी होयच्या .ज्या साकवावरून पावसात चालणे मुश्कील असायचे त्याच साकवावरून आम्ही मोठ्या सुट्टीत जेवणासाठी चे अंतर अवघ्या ३० सेकंदात पार करत असू. साकवाची आठवण जेवढी काढू तेवढी कमीच आहे मग घरून आणलेले आंबट असो की साकवाखाली लपवले आंबे, नारळ ,फणस असो.
याच साकवाच्या बाजूला एक कनक (कनग/बांबूचे बेट)याचा आवाज म्हणजे जो भुताला देखील घाबरत नाही तो या आवाजाने टरकायचा.याच सकवावरून आमच्या हद्दीत आलो म्हणजे कणकेमधले भूत काही नाही करत अशी भावना होती. हीच भीती दाखवण्याची पद्धत असेल कदाचित आमच्या सारख्या उनाड मुलांना.
साकव जसा आम्हाला उपयुक्त होता तसाच पंचक्रोशीतील लोकांना देखील उपयोगी होता. सगळी दळण वळण याच रस्त्याने होते अजून ही याच रस्त्यावर एका मोठया गावाइतकी रहदारी नेहमी होत असते.
साकवाच्या जागी आता गाड्यांचा पूल झाला.याच ठिकाणावरून जाताना साकवासाठी तयार केलेल्या खुणा(दगडांमध्ये मारलेले खड्डे) पाहताना आता देखील साकवाची आठवण नक्कीच डोळे ओले करून जाते .
मूळ लेखक
चेतन मेस्त्री
मारवेली जिल्हा रत्नागिरी