नागपंचमी पतंग पंचमी. आणि वावड्या
वावड्या उठवणे याचा शब्द कोशातील अर्थ चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी असा आहे. पण वावड्या उडवणे हा आमच्या सोलापूर जिल्ह्यातील एक आनंददायी सोहळा आहे. ठ आणि ड याच काय ते दोन अक्षरांचा फरक आहे. पण तेवढं बदललं तरी किती फरक पडतोय. याची गंमत आहे.
जगभरात संक्रांत सण हा पतंग उडविण्याचा सण म्हणून ओळखला जातो. गुजरात मध्ये मोठं मोठे पतंगोत्सव भरतात. जगभरातून पतंग उडवणारी हौशी मंडळी तेथे येतात विविध आकाराचे पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. ते बघायला सुद्धा जग भरातून माणसं जमतात.
पण नेहमीच वेगळे पण जपणार आपलं करमाळा पतंग उडविण्याच्या बाबतीत सुध्दा जगावेगळा रिवाज बाळगून आहे. येथे संक्रांतीच्या ऐवजी नागपंचमीच्या दिवशी पतंग उडविण्याचा कसा रिवाज पडला हे न समजणारं कोड आहे. करमाळा , कुर्डुवाडी, माढा वैगरे भागात नागपंचमी दिवशी पतंग उडविला जातो. आणि हळूहळू या सणाला पतंगपंचमी असंही नामकरण होऊ लागलंय. शाळेला नागपंचमी ची सुट्टी आहे. या वाक्याऐवजी शाळेला पतंगपंचमी ची सुट्टी आहे असं बोली भाषेत रूढ होताना दिसत आहे.
या वेळेत वेगळ वैशिष्ट्य म्हणजे वावड्या उडवण्याचा छंद होय. वावडी हा पतंगाचा च एक प्रकार आहे. पण आकाराने आयताकृती आणि बांबूच्या काड्यांनी आकाराचे दिलेली वावडी उडवणे हा कौशल्यपूर्ण कार्यक्रम आहे. काळाच्या ओघात दुकानात जाऊन तयार पतंग विकत घेऊन ते उडवणे सोईस्कर आणि सोपं आहे. एक दोन जण सुद्धा पतंग उडविण्याच्या कार्यक्रमाला पुरेसे होतात. पण वावडी उडवणं तितकं सोपं नाही. दहा बारा जणांची टिमच या कामी लागते. वावडी घ्या आकारा नुसार जास्त माणसं मदतीला लागतात. दोन फुटापासून ते पंधरा वीस फुट उंचीची वावडी बनवली जाते . तिला सुशोभित करण्यात येते. वाऱ्यावर फडफडणारा आवाज येण्यासाठी मधोमध दोरी वर कागद विशिष्ट प्रकारचे कातरून अडकवला जातो. साधा मांजा या वावड्या उडवण्यासाठी तग धरू शकत नाही म्हणून आकारमानानुसार जाड नायलॉन दोर अगर सुतळी लागते. मोठ्या आकाराच्या वावडीला खूप ओढ असते . खूप उंच गेल्यावर या लहान मुलं अशक्त माणसं यांना सहज ओढत नेऊ शकतात . म्हणून एका वेळी वावडी उडवण्यास जास्त माणसांची गरज पडते.
वावडी बनवणं हाही सोपा प्रकार नाही. मोठा संशोधनाचा विषय असल्या सारखा प्रकार आहे. त्यात तरबेज माणसाला वेगळा मान असतो. त्या साठी लागणाऱ्या बांबूच्या काड्या कशा निवडायच्या, कशा चिटकवायच्या , तिला बॅलन्स राहण्यासाठी शेपूट कसं बांधायचं. किती लांब बांधायचं, दोरी बांधण्यासाठी सुत्र कसं तयार करायचं यात डॉक्टरेट मिळवलेले अनेक जण येथे खेडोपाडी दिसतील. वंशपरंपरागत हे ज्ञान पुढच्या पिढीकडे चालत आलंय.
लहानपणी आमच्या भागात उडवल्या जाणाऱ्या वावड्या आताशा खूपच कमी झाल्या आहेत. तयार पतंग उडवणे सोपं असल्याने वावड्या बनवणं त्या साठी खर्च करणं आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी वेळ देणं कुणाला शक्य नाही.
पण आज पंढरपूर कुर्डुवाडी रोडवर एका ठिकाणी असा हौशी मंडळींचा समुह वावड्या उडवण्यासाठी जमलेला दिसला . थोडावेळ थांबून आवर्जून वावडी उडवण्याचा सोहळा पाहीला. हा वर्षांपासून ते पन्नास साठ वर्षांपर्यंतची मंडळी हौशेने जमली होती. मोबाईलवर काही फोटो आणि व्हिडिओ काढले.
पतंग उडविण्याच्या कार्यक्रमाला जेवढं मोठं स्वरूप दिलं गेलंय तेवढं वावड्या उडवण्यासाठी सुद्धा दिलं गेलं तर मोठा उत्सव आपल्या ही भागात होऊ शकतो आणि आपल्या भागाच प्रादेशिक वेगळेपण जोपासलं जाऊ शकत असा एक विचार मनात येऊन गेला.