माणसं अशी का वागतात ? हा प्रश्न पडलेला नाही असा माणूस सापडणं कठिनच आहे ! दुसऱ्यातील चांगलं तेवढंच पहावं ज्याचा कोणालाच लाभ नाही ते कायम स्वरूपी सोडून द्यावं ;मला वाटतं हा विचार अनेक अर्थाने हिताचा आहे.पण असं सहज करणं शक्य असूनही माणूस कमी का राहिलं म्हणून तिथंच थांबून राहतो.दहा चांगली कामे केली असतील तेव्हा कोणी नाव काढणार नाही पण एक चुक होऊ द्या त्याची संस्कृती,संस्कार ,परंपरा,घराणं सगळ्याचा उद्धार होऊ लागतो.बरं असं नाही की समोरचाच फक्त चुकतो ! आपण त्याच रांगेत असतो पण स्वतःला आपण नेहमीच मोठ्या मनाने माफ करतो ! दुसऱ्याला मात्र सतत धारेवर धरत असतो. आयुष्यात जस जसं पुढे जात राहणार काही चांगलं घडणार काही चुकीचं घडणार याची जाणीव नेहमीच जागृत असायला पाहिजे.बाण मारला की केंद्रस्थानी लागेल हा प्रयत्न ठिक आहे पण परिणाम नाही तसा आला तरी तो आनंदाने स्वीकारला पाहिजे. दुसऱ्याच्या चुका पाहून मला शिकता येण्यासारख्या,अमलात आणण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याने आपला लाभ संभव आहे. समोरच्याने काय करावं करू नये हे आपण ठरवण्याचा नाहक त्रास स्वतःला करून घेऊ नये त्यालाही त्याच्या मार्गाने जाऊ द्यावं.आपलं समाधान इतर कोणाच्या आणि कोणत्याही भौतिक साधन सामग्रीत नाही ते आपल्याच विचार करण्याच्या पद्धतीत आहे याची आठवण विसरू नकोयात.चुका पहात रहाण्याची सवय हळूहळू वृद्धिंगत होत राहते आणि आपण सगळ्याच चांगल्या माणसांपासून आणि विचारांपासून एकाकी होत जातो.एकाकी होणं म्हणजे अति अंहकारी बनत जाणं आणि पुढे जाऊन हाच अहंकार नकारत्मकता आणि नैराश्याच गाठोडं बनतो .