पोटाला भाकर मिळेल का?

पोट तुझं भरलं असेल तर,
देवा माझ्यासाठी घेऊ का,
तुझं राहिलेलं उष्ट,
माझ्या घरी मी नेऊ का.? देवा इथे मात्र तुमची,

मस्त अंगत पंगत रंगलीय,
घरात पीठ नाही म्हणुन,
सकाळीच आई बाबांसोबत भांडलीय. आटवा भर पिठासाठी,

आई सगळ्या गल्लीत हिंडली,
सगळ्या शेजारच्यांनी,
तुझ्या निवदाची सबब सांगितली. देवा आज सकाळी मला,

सडकून भूक लागली,
अचानक तुला आठवून,
तुझ्या मंदिराकडे धुम ठोकली. देवा मला तुझा ,

कधी कधी हेवा वाटतो,
एका जाग्यावर बसुन,
मस्त निवदाचा मलिदा लाटतो. दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,

नारळाचा तुकडा हातावर ठेवला,
तुला मात्र देवा त्यांनी,
अर्धा नारळच वाहिला. माफ कर देवा मला,

तुझा घास हिसकावतोय,
अर्ध्या कोर तुकड्यासाठी,
भाऊ माझा घरात रडतोय. देवा मी आता ठरवलंय,

तुझ्यासोबत बंड करायचं,
माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी,
स्वतःच पेटून उठायचं!”

Leave a comment