पखालीचं पाणी

पखालीचं पाणी………….
काहीतरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी अथवा आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी केलेला खटाटोप त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जुगाड म्हणतो किंवा इतर दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून नाईलाज असतो स्वीकारलेलं सत्य असे कितीतरी अनुभव आपल्याला आलेले असतात आता अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट आपण योग्य वेळी अवलंब करून वापरात आणली आणि ती आपला अविभाज्य अंग नाहीतर अवयव झाली आता त्यापैकी पखाल
. आमच्या मामाचं गाव तसं बघायला गेलं तर पार अहमदनगर जिल्ह्यातलं लोणी प्रवराजवळ एका बाजूला सोनगाव आणि दुसऱ्या बाजूला पाथरे साधारणपणे हजार बाराशे घराचं गाव सगळीकडे हिरवगार शेत आणि बहुतेक प्रत्येक शेतात विहिरी पण अशा दुर्गम भागामध्ये मी शाळकरी जीवनामध्ये पखाल पाहिली आता सध्या मोटे ऐवजी अजूनही काही ठिकाणी विहिरीवर मोटरच्या स्वरूपात बघायला मिळते पण आता काय झाले विहिरीवर मोटारी आल्या त्यामुळे हे साधन बहुतेक लोप पावत चाललेलं दिसतयं पण अजून क्वचित प्रसंगी ही पखाल बघायला मिळते तर ह्या पखालीचं स्वरूप म्हणजे पूर्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवासाला जाण्यासाठी दुर्गम भागामध्ये लागलेली नदी आणि पुढील प्रवासामध्ये पाणी जवळ असावं कारण तेव्हा बॉटल… कॅन किंवा जार असलं काही अस्तित्वात नव्हतं म्हणून बहुतेक ठिकाणी पखालीचा वापर करायचे आणि त्याचं काय आहे पूर्वी जनावरे मेली की त्या प्राण्यांचे चामडे म्हणजे कातडे काढून ते व्यवस्थित करून त्या चामड्याचे दोन पिशवीच्या आकाराचे भाग करून रेड्याच्या व उंटाच्या पाठीवर त्या चामड्याच्या पिशव्या दोन्ही बाजूस दोर बांधून दूरवरून पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणायचे
. त्या चामड्याच्या पिशवीला जुने लोक पखाली म्हणायचे थोडक्यात म्हणजे हे पाणी मातीच्या त्या मोठ्या रांजणात एकदम त्या मोठ्या माठात भरून ठेवलं जायचं थोडक्यात म्हणजे जुन्या काळातील एक चामडी वॉटर बॅग म्हणजे पखाल होय आता बारे धरणे म्हणजे शेतात पाणी देणे ही कृती केली जाते म्हणजे बारे धरणे होय आळीपाळीने शेतात पाणी फिरवले जाते शेतमजुरी करताना लोकं पखालीचं पाणी पीत होते भाकर तुकडा खाल्ला की पखालीचं पाणी पिऊन पुन्हा कामाला जुपलं जायचं थोडक्यात पखाल म्हणजे पाण्याचा बुधलाचं पखालीमध्ये साधारणता 20 ते 30 लिटर द्रव वाहून नेण्याची क्षमता असायची काही ठिकाणी या पखालीला मशक असेही म्हणायचे आता म्हणाल तर पाणी ही मानवी जीविताची मूलभूत गरज अनादी काळापासून मानवी वस्त्याही जवळपास पाण्याची सोय पाहूनच वसलेल्या असायच्या मेलेल्या जनावरांच्या चामड्याच्या पिशवीत पाणी भरून वाहून नेणारा किंवा उपलब्ध करून देणारा…भरणारा कष्टकरी… मोलकरी…कामगारांचा वर्ग म्हणजे त्यांना पखालजी म्हणायचे सर्व दूर पाणी पूर्वी पंपिंगची सोय नसल्यामुळे तिचा वापर पाण्याच्या स्रोता पासून घरापर्यंत किंवा कोणत्याही ठिकाणापर्यंत आवश्यक असणारे पाणी किंवा द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी करण्यात येत होता त्यासाठी मनुष्यबळ वापरण्यात यायचं तवा काही पाईपलाईन किंवा अन्य व्यवस्था नव्हती
. पखालीची रचना काहीसी पूर्ण पाठ व्यापणाऱ्या मोठ्या पण एकच बंद असणाऱ्या सध्याच्या होंडा बॅगसारखी असायची पखाल पाठीवरून वाहून नेण्यासाठी खास चामड्याचेच बंध असायचे पाणी ओतण्यासाठी तिला निमुळते तोंड असायचे पखालीला प्रत्येक खेपेनुसार रक्कम ही मेहनताना म्हणून दिली जायची काही ठिकाणी काही वेळेस पखाखालीतील पाणी पिण्यासाठी निशिद्ध समजण्यात यायचं आता हे म्हणजे ज्याची त्याची मनस्थिती आणि विचाराची अंमलबजावणी म्हणजे बघा आताचा जरी विचार केला तर नळातून आलेले पाणी म्हणजे चामड्याचे गॅसकेट पाईपच्या जोडाजवळ वापरतात म्हणून अन नदीचे पाणी म्हणजे वरील बाजूस काहीतरी घाण अथवा कपडे धुतल्यामुळे तेच पाणी खाली येतं म्हणून अन विहिरीचं पाणी साठवणीचं असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी पडून मेलेलं आणि ते सडलेलं अशा अवस्थेतलं पाणी पण पिण्यासाठी निशिद्ध अशा लोकांना मग शुद्ध पाणी मिळायचं कुठून तर त्यांचा समज असा की नदी किनारी योग्य जाग्यावर वाळूमध्ये एखाद्या फूटाचं हातांनीच केलेलं खोदकाम आणि त्या असंख्य वाळूच्या कणातून आलेलं ते फिल्टरचं पाणी म्हणजे झरा आणि त्याचं पाणी सर्वात शुद्ध असं प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी सहजपणे शक्य होत नसतं झपाट्याने होणारे शहरीकरण नवीन सुधारणा नवीन सोयींची सहज उपलब्धता त्यामुळे काल-परवा आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू आता कालबाह्य ठरवून नाहीशा होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते खालसे बनती है वो पखाल तर संस्कृत मध्ये प्रखल्ल म्हणजे कातडी पिशवी यावरून पखाल शब्द प्रचलित झाला
. या पखालीला खांद्याला अडकवण्यासाठी पट्टा असतो पखाली मध्ये दोन आकार असतात त्यांना नर मादी पण म्हणतात यातलं पाणी बहुतेक पिण्यासाठी वापरत नसायचे पण जी बांधकामं केली जायची त्यावरील गिलाव्यावर म्हणजे सिमेंटच्या प्लास्टरवर सतत पाणी मारावं लागायचं त्याच्यामुळे बांधकाम अधिकच मजबूत व्हायचं खांद्यावरील पखालीचं डाव्या हाताने तोंड धरून त्यातील पाणी उजव्या हाताने पखालीच तोंड धरून उजव्या हातातील भांड्यामधून सतत त्या बांधकामावर मारलं जायचं भिंती सतत भिजलेल्या अवस्थेत ठेवणारे म्हणून त्यांना भिस्ती म्हणायचे त्यांनी मारलेल्या पाण्याच्या सातत्यावर व प्रमाणावर त्या बांधकामाची मजबुती अवलंबून असायची याच चामड्याच्या पखालीसारखी बनवलेली आणि वापर असणारी पण अलीकडील काळात लोप पावत चाललेली साधनं म्हणजे विहिरीवरील मोट शेतीसाठी पाणी उचलण्याकरता कातडी मोटा या मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या त्यांची रचनाच अशी असायची की मोटा दोन प्रकारच्या असायच्या एक सोंडेची तर दुसरी बिनसोंडेची मोट म्हणजे एका तोंडापासून दुसऱ्या तोंडापर्यंत निमुळती होत जाणारी साधारण चार ते सहा फुटापर्यंत लांबीची एक कातडी पिशवी तिचं तोंड लहान म्हणजे 20 सेंटीमीटर व मोठे तोंड 40 ते 50 सेंटीमीटर व्यासाचं असायचं त्याला एक लोखंडी कडी वजनासाठी जोडलेली असायची
. मोटेच्या लहान तोंडाला सोंड म्हणायचे त्या लहान तोंडास सोंडदोर व मोठ्या तोंडाला नाडा बांधून दोन्ही दोर मोटवनावरील दोन लाकडी चाकावरून घेऊन बैल जोडीच्या मानेवरील जोखडास बांधायचे विहिरीत बुडाल्यावर मोटेमध्ये दोन्ही तोंडातून पाणी भरलं जायचं मोट पाण्याने पूर्ण भरल्यावर बैल मोटवनापासून दूर अशा धावेवरून जोरात खाली चालू लागायचे अन मोट वर खेचली जायची त्या धावेवरचा रस्ता पण विशिष्ट असा उताराचा केलेला असायचा की ज्यायोगे बैलांचे कष्ट कमी लागतील व त्यांना सोयीस्कर होईल धावेला उतार असल्यास त्यामुळे मोट ओढणे बैलांना सोपे व्हायचे व राहिलेली मोट मोटवनापाशी खेटल्यावर आतील सर्व पाणी सोंडेतून थारोळ्यात पडायचं मोट रिकामी झाल्यावर ती स्वतःच्या वजनाने विहिरीत उतरू लागायची आणि बैल पण पाठमोरे म्हणजे उलटे मागे सरकत रिवर्स अशा अवस्थेमध्ये धावेवर चढू लागायचे बैल थारोळ्याजवळ पोहोचले की मोट पाण्यात बुडते नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे या सर्व क्रिया पुन्हा पुन्हा घडतात वापरानंतर या मोटा वाळवून नीट ठेवल्यानंतर त्या एक वर्षभर सहज टिकतात या सिस्टीम प्रमाणे कालांतराने सुधारणा होऊन पाण्याची कावड…पाण्याची दोन-चार कॅन सायकलला त्याच्याभोवती अडकवायचे पाण्याची वाहतूक करायची …नंतर बैलगाडीतून मोठे 200 लिटर वाले पाण्याचे पिंप नदीवरून भरून आणायचे…त्यानंतर ट्रॅक्टरला किंवा ट्रकला जोडलेले पाण्याचे टँकर…अशी सुधारणा हळूहळू होत गेली आणि अजून पखालीचा विचार केला तर पूर्वी कोळी समाजातील लोक हा व्यवसाय करायचे त्यावरून त्यांना पानकरे कोळी किंवा पानकोळी म्हणून संबोधित असायचे कोळी समाजाचा वंश परंपरागत चालत आलेला मुख्य व्यवसाय म्हणजे गावातील बलुतेदारांना पाणी पुरवणे हा होता त्या बदल्यामध्ये कोळी मिळेल त्या धान्यावर आपली उपजीविका करायचे.

मूळ लेखक – किरण बेंद्रे
पुणे

Leave a comment