शास्त्र आणि विज्ञान वेगवेगळे आहेत!
विज्ञान म्हणजे शास्त्र नव्हे.
विज्ञान म्हणजे एखादी माहिती, विशिष्ट प्रयोग पद्धत वापरून पुराव्यानिशी सिद्ध करणे. जर कोणीही हा प्रयोग केला तर विज्ञानाने सांगितलेला निष्कर्ष सिद्ध होतो.
शास्त्र म्हणजे एखादी माहिती ग्रंथाने, गुरूने, देवाने, परंपरेने, धर्माने सांगितले आहे म्हणून खरे मानणे.
विज्ञान निसर्गातील प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी पदार्थ विज्ञान, गणित, रसायन विज्ञान, जीवविज्ञान, इ. वैज्ञानिक नियमानुसार तयार झालेल्या प्रणालींचा वापर करते.
शास्त्राची सिद्ध करण्याची पद्धत पारंपरिक असते किंवा वैयक्तिक असते. त्यासाठी अतिंद्रिय शक्ती, चक्रे, पंचतत्वे, शरीराभोवतीची वलये, पूर्वसंवेदन, देवाचे आणि अंर्तमनातील आवाज, त्रिदोष, साक्षात्कार, उर्जा तरंग, किंवा एखाद्या शास्त्र्याने सांगितलेले नियम वापरले जातात.
विज्ञान सर्वांनी वा कोणीही तपासून खरे-खोटे सिद्ध करण्याची मुभा असते.
शास्त्रातील माहिती खरी किंवा खोटी आहे हे कुणीही तपासण्यास मज्जाव असतो. किंबहुना तसा कोणी प्रयत्न केला तर तो पाखंडी, नास्तिक, धर्मद्रोही समजला जातो.
विज्ञान जो सांगतो तो वैज्ञानिक पवित्र वगैरे समजला जात नाही. त्याची पूजा केली जात नाही.
शास्त्र ज्याने सांगितले आहे ती व्यक्ती पवित्र समजली जाते. त्याची पूजा आणि अर्चना केली जाते.
कोणत्याही वैज्ञानिकाच्या नावाने दरबार भरविला जात नाही आणि त्याचे मंदिर वैज्ञानिक उभे करत नाहीत. उलट त्या वैज्ञानिकाने लावलेल्या शोधाची चिकित्सा केली जाते.
शास्त्र सांगणार्यांची मंदिरे-मशिदी-चर्च उभारून त्यांचे दरबार भरविले जातात, यात्रा-जत्रा केल्या जातात. आणि त्याची भक्ती केली जाते.
जर एखादी गोष्ट सिद्ध झालेली नाही असे दिसले तर ती गोष्ट विज्ञानात टाकून दिली जाते.
शास्त्रात कोणतीही गोष्ट सिद्ध होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण ती देवाने-शास्त्रीने सिद्ध केली आहे म्हणून ती सिद्ध झाली आहे असा नियम असतो. त्यामुळे हजारो वर्षे तेच ते शास्त्र शिकवले-पढविले जाते. एका शब्दाचा देखील बदल सहन केला जात नाही.
विज्ञान बदलण्यास तयार असते.
शास्त्र हट्टी असते. ते स्वतःला अंतिम समजते.
विज्ञान आपले सर्व नियम उघडपणे जाहीर करते.
शास्त्र हे गुढ नियम असतात असे मानते.
हजारो लोक म्हणतात म्हणून तो पुरावा विज्ञान मानत नाही.
लाखो लोक म्हणतात म्हणून तोच पुरावा समजा असे शास्त्र बजावते.
विज्ञान कोणालाही समजून घ्यायला हरकत घेत नाही.
शास्त्र मात्र असे म्हणते की आमचे ज्ञान अचूकच आहे आणि जर कुणाला ते तसे वाटले नाही तर समजून घेणार्यात काही तरी दोष आहे!
विज्ञान सिद्ध होऊ शकेल असे नियम बनविते व व्यवहारात आणते.
शास्त्र हे वर्णन करते आणि व्यवहार कसे करावेत हा उपदेश करते.
विज्ञान आणि शास्त्र या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. पण विज्ञानाला “शास्त्र ” म्हणणे म्हणजे बौद्धिक गोंधळ आहे. भौतिक शास्त्र नव्हे तर भौतिक विज्ञान असे बोलणे-लिहिणे बरोबर ठरते.
विज्ञान हेच अंतिम सत्य आहे असे मानत नाही. त्याहूनही चांगली पद्धत असेल तर त्याचे विज्ञान स्वागत करेल.
पण आमचे शास्त्र अंतिम सत्य आहे व तेच वर्षानुवर्षे पाळा हा आग्रह सत्याचा नाश करणारा आहे.
म्हणून, यापुढे शास्रास मुठमाती द्या. विज्ञान स्विकारा.
- डाॅ. प्रदीप पाटील