स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने
इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई आपला ८ वर्षांचा मुलगा दामोदर राव यांना कापडाने पाठीवर बांधून घोड्यावर स्वार झाल्याची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कोरलेली आहे. खेदाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने अथवा भारतीयाने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही…..लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्यानंतर झाशीच्या अल्पवयीन राजपुत्राचे काय झाले?
राणीचा मुलगा दामोदर राव आणि त्याच्या पुढच्या ५ पिढ्या इंदूरमध्ये अज्ञात जीवन जगल्या, हे केवळ मोजक्याच लोकांना माहीत आहे.

कोणतीही सरकारी किंवा सार्वजनिक मदत न मिळाल्याने, राणीच्या वंशजांच्या पहिल्या दोन पिढ्यांनी आपले जीवन अत्यंत गरिबीत भाड्याच्या घरात घालवले. त्यांना शोधण्यासाठी कधीही प्रयत्न झाले नाहीत.
खरेतर, राणीचे वंशज २०२१ पर्यंत इंदोर शहरात राहिले होते. नंतर ते नागपुरात स्थलांतरित झाले, जिथे सहाव्या पिढीतील वंशज आता एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि आजही अज्ञात जीवन जगणेच पसंत करतात. फक्त झांशीवाले हे नाव आपल्या नावामागे जोडून त्यांनी झाशीशी असलेला संबंध जिवंत ठेवला आहे.
सॉफ्टवेअर अभियंता योगेश अरुण राव झाशीवाले (४४) हे राणी लक्ष्मीबाईंच्या कुटुंबातील सहाव्या पिढीतील वंशज आहेत. ते सध्या त्यांची पत्नी प्रीत आणि दोन मुले प्रीयेश आणि धनिका यांच्यासह नागपुरात राहतात. त्यांचे वडील अरुण राव झाशीवालेही त्यांच्यासोबत राहतात. तत्कालीन एमपी इलेक्ट्रिसिटी बोर्ड (एमपीईबी) मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवृत्त झालेले अरुण राव यांचे इंदूरमधील धन्वंतरी नगरमध्ये घर आहे.
दामोदर राव यांनी २० मे १९०६ रोजी वयाच्या ५७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मागे त्यांचा मुलगा लक्ष्मण राव झांसीवाले यांना ब्रिटिशांनी दरमहा २०० रुपये पेन्शन दिली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारने लक्ष्मण राव यांना रेसिडेन्सी परिसरातील घर रिकामे करण्यास सांगितले. त्यामुळे इंदूरच्या राजवाडा येथील पीरगली भागात भाड्याच्या घरात राहण्याशिवाय राणी लक्ष्मीबाईच्या वंशजांना पर्याय नव्हता.
झाशीच्या राणीचे नातू श्री. लक्ष्मण राव हे जिल्हा न्यायालयात फ्रीलान्स टायपिस्ट म्हणून काम करत होते. आत्यंतिक गरीबीमुळे हे कुटुंब अनेकदा उपाशी पोटी झोपले होते. मुलगा कृष्णराव झाशीवाले आणि कन्या चंद्रकांताबाई यांना मागे ठेवून १९५९ मध्ये अत्यंत गरिबीत त्यांनी हे जग सोडले. राणीचे पणतू कृष्णराव इंदूरच्या हुकुमचंद मिलमध्ये स्टेनो-टायपिस्ट म्हणून काम करत होते. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना दरमहा १०० रुपये पेन्शन मिळत असे. त्याच भाड्याच्या घरात संपूर्ण आयुष्य व्यतीत केल्यानंतर, कृष्णराव यांचे १९६७ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने राणीच्या वंशजांचे पेन्शन बंद केले.
त्यांचा मुलगा अरुण राव झांसीवाले अभियंता होते आणि एमपीईबीमध्ये रुजू झाले. १९९४ मध्ये त्यांनी इंदूरमधील धन्वंतरी नगरमध्ये घर घेतले. खरं तर, राणीने मुलगा दामोदर रावसह झाशी सोडल्यानंतर, कुटुंबाला घर घेण्यासाठी पाच पिढ्या प्रतीक्षा करावी लागली.
अरुण राव झांसीवाले (निळा कुर्ता) त्यांचा मुलगा योगेश राव झांसीवाले (लाल कुर्ता) त्याची सून प्रीत आणि त्यांची दोन मुलं प्रीयेश आणि धनिका राव झांसीवाले.