
कोपरी_आई : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चालुक्यकालीन ‘होयसळ’ पद्धतीचे अप्रतिम शिल्प असलेलं शिवमंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरात लागूनच सटवाईचे मंदिर आहे तिला माणकेश्वरची आई असंही म्हणतात.सटवाई हे अनेकांचे कुलदैवत आहे आणि ते आमचंही कुलदैवत आहे. पूर्वी तिथं छोटं मंदिर होतं आणि त्यात घडीव मूर्ती नव्हती. सटवाई ही शाक्त पंथातील असून ती सप्तमातृकांपैकी पहिली आहे.सटवाईची पूजाअर्चना पद्धती पूर्णपणे शाक्त पद्धतीची आहे, इतर देवतांसारखी रूढ पूजापद्धती नाही. सटवाई अर्थात षष्ठी ही बाळाच्या कपाळावर जन्मल्यावर पाचव्या दिवशी मध्यरात्री येऊन त्याचं भविष्य लिहिते असंही म्हणतात. सटवाईला बोकडाचा मान नसून कोऱ्या पाटीचा अर्थात फलन नं झालेल्या शेळीचा मान असतो. उदा. आई सांगते, मी जमल्यावर चौथ्या आठवड्यात मला तिथं पायावर घालण्यासाठी घेऊन गेले, तिथल्या परंपरेप्रमाणे चार रुपयांची एक पाट विकत घेतली, तिला माझ्या नावाने नाडा बांधला आणि पाट देवीच्या नावाने सोडून दिली. देवीच्या नावाने सोडून दिलेल्या नवसाच्या अनेक पाटी तिथं फिरताना मी ही बघीतलेल्या आहेत. नंतर वर्षातून एकदा की दोनदा सगळ्या पाटी गोळाकरून ग्राम पंचायत त्या पाठींचा हारास करीत असे.माझ्या जावळासाठी आज्जीने दोन बोकडांचा पवित्र बळी दिला होता म्हणे. असो!
सांगायचा मुद्धा असा आहे की, सटवाईला गेल्यावर सटवाईच्या मूळ ठाण्यावर जाण्यापूर्वी शिवमंदिराच्या एका शिल्पाची पूजा करणे महत्वाचे होते. मंदिराच्या नैऋत्येस असलेल्या (फोटोत दिसतंय) त्या शेंदूर लावलेल्या मूर्तीला 'कोपरी आई' म्हणतात आणि तिची पूजा करण्याला 'कोपरी पूजा'. त्या संदर्भातील आख्यायिका अशी आहे की, 'एक बाई एकटीच छोट्या बाळाला आईच्या पायांवर घालण्यासाठी घेऊन गेली होती. तिने बाळ खाली कोपरी आईसमोर झोपवून पूजा केली आणि ती परिक्रमेसाठी निघाली. तेंव्हा तिच्या मनात कुशंका आली की,'माझं बाळ एकटंच आहे, तिला देवीनं गिळलंबिळलं तर?' ती परिक्रमा करून आली तर, खरंच देवीने बाळ गिळलं होतं,बाळाचा फक्त कोपर देवीच्या तोंडातून बाहेर दिसत होता.बाळाच्या आईने ते पाहताच देवी आहे त्या अवस्थेत स्थिर झाली. सोलापूर येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख Maya Shahapurkar Patil यांनी १९९१ साली त्यांच्या पुस्तकात ही कोपरी आई नसून 'पत्र लेखिका' असं शिल्प असल्याचं म्हटलेलं आहे. तसं त्यांनी पुरातत्व खात्याला सांगितलं होतं.पण गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून त्या शिल्पावरील शेंदूर काढता आला नाही. शेवटी ४ ऑगस्ट २०२२ साली माणकेश्वरच्या गावकऱ्यांची समजूत काढण्यात पुरातत्व खात्याला यश आले आणि 'पत्रलेखिकेचे' शिल्प शेंदरातून मोकळे झाले. बहुजन समाजाची एकमेव साक्षर देवता सटवाई खरोखरच नशीब लिहिते की नाही, हे माहीत नाही, पण या शिल्पातील सुंदरी काहीतरी लिहितेय हे मात्र खरं.बहुजनांच्या बुद्धीवर अंधश्रद्धेची चढलेली पुटं ज्या दिवशी ते स्वतः शेंदरासारखी खरवडून काढायला सुरुवात करतील, तेंव्हा खऱ्या सामाजिक परिवर्तनाला सुरुवात होईल तो सुदिन!