🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
हा लेख मा,सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक मा,राम पवार सरांचा आहे ,
नाही तर जे चालू आहे ,ते चालू ठेवावे कर्म चे फळ निच्चीत बघायला मिळेल आज नाही तर उदया
ते अदृश्य हात……..
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, वर्धा येथे रुजू होऊन मला साधारणत: पंधरा-वीस दिवस झाले होते. मला दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. त्यांच्या स्विय सहायकाने मला निरोप दिला की, मा. जिल्हाधिकारी महोदयांनी आपणास तात्काळ कार्यालयात बोलावले आहे. त्यावेळी मा. चोक्कलिंगम साहेब जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत होते. अत्यंत कडक शिस्तीचे व कामाचे बाबतीत अत्यंत कार्यक्षम असा त्यांचा सर्वदूर आदरयुक्त धाक होता. मला निरोप मिळाला व माझ्या डोक्यात विचार फिरू लागले. कशाला बोलावले असेल? कांही तयारी करावी लागणार का? एक ना अनेक विचार मनात येत होते. वाहनचालकाला आवाज दिला, गाडी काढली व कांही मिनिटात मी जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचलो.
मा.चोक्कलिंगम साहेबांची माझी दुसरी-तिसरी भेट होती. पहिल्यांदा रुजू झाल्यानंतरची सदिच्छा भेट व त्यानंतर एखाद्या बैठकीतली. परंतु कधीही कोणत्याही विषयाबाबत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्याबाबत जे ऐकून होतो, त्यामुळे जरा मनात चूक-चूक होतीच. साहेबांच्या चेंबरमध्ये एक महिला व एक पुरुष अशी दोनच माणसे बसली होती. आत गेल्यानंतर मी सर्वांना नमस्कार केला. साहेबांनी बसण्यास सांगितले आणि चर्चेला सुरुवात झाली. त्यांनी समोर बसलेल्या दोन्ही अभ्यागतांना उद्देशून सांगितले, पवारसाहेब यांचा काहीतरी विषय आहे. ते काय सांगतात, ते मला कळले नाही. त्यामुळे आपण बाजूच्या खोलीत बसून त्यांचा विषय समजून घ्या. आपणास या बाबत कांही करता येत असेल तर करा. आपली चर्चा झाल्यानंतर त्यांचा विषय कसा हाताळता येईल, ते मला सांगा. होय, म्हणून मी त्या अभ्यागतांना माझ्या सोबत येण्याची विनंती केली. आम्ही तिघेही साहेबाच्या चेंबरलगतच्या खोलीत जाऊन बसलो.
नगर परिषद, पुलगाव मार्फत एक माध्यमिक शाळा चालविली जाते. माझ्यासमोर बसलेली महिला त्या शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. त्यांची नियुक्ती अनुकंपा योजनेअंतर्गत करण्यात आली होती. तथापि, त्यांच्या नियुक्तीला मान्यता नाकारल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तिच्या सेवा समाप्त केल्या होत्या. घरात कोणीही कमावती व्यक्ती नाही. दोन मुली आहेत त्याही त्यांचेवरच अवलंबून आहेत. सेवा समाप्त केल्यामुळे मुलींचे पालन-पोषण व लग्न इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांनी दोन वेळा मुलींसह आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून वेळीच उपचार झाले व त्यामुळे आज त्या हयात असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगत असतांना ते आपल्या जवळील दस्तऐवजही मला दाखवत होते. संपूर्ण हकीकत ऐकून मी सुन्न झालो होतो.
प्रकरण असे होते की, नियुक्तीनंतर त्यांचा मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय सादर करण्यात आला होता. त्या वाल्मिकी समाजातील असल्यामुळे नगरपरिषदेने त्यांना “सफाई कामगार” म्हणून नियुक्ती आदेश दिला होता. शाळा समितीच्या ठरावातही व नियुक्ती आदेशातही “सफाई कामगार” असा उल्लेख करण्यात आला होता. माध्यमिक शाळेला चतुर्थ श्रेणीची जेवढी पदे मंजूर होती, त्या मंजूर पदात तिची नेमणूक होती. तथापि, संचमान्यतेत सफाई कामगारांचे पद मंजूर नाही, या कारणास्तव तिच्या नियुक्तीला मान्यता नाकारण्यात आली होती. तिच्याकडे जे दस्तऐवज उपलब्ध होते त्यावरून तेवढाच बोध होत होता. केवळ संचमान्यतेत सफाई कामगारांचे पद मंजूर नाही, या एकाच कारणासाठी तिची मान्यता नाकारली होती. ही बाब मुळातच मला पटली नाही. ठरावात व नियुक्ती आदेशात “सफाई कामगार” ऐवजी “शिपाई” अशी दुरुस्ती करून मान्यता प्रदान करता आली असती, तर पुढील सर्व गुंतागुंती टाळता आल्या असत्या, असे मला लगेच वाटून गेले. परंतु, त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असल्यामुळे आता सोपे काम अवघड झाले होते.
त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी मा.चोक्कलिंगम साहेबांना थोडक्यात वृत्तांत सांगितला. आपल्याला कशी मदत करता येऊ शकेल हे ही सांगितले. विषय नगरपरिषदेचा असल्यामुळे आपलीही मदत मला लागेल, असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला.
कार्यालयात आल्यानंतर या विषयाशी संबंधित लिपिकाला बोलावून सर्व नस्त्या घेऊन चर्चेसाठी येण्यास सांगितले. कार्यालयातील नस्त्या पाहिल्यानंतर संबंधित लिपिक व अधिक्षक यांच्यासोबत चर्चा केली व नगर परिषदेला त्यांना तात्काळ पुन्हा सेवेत रुजू करून घेऊन त्यांचा शिपाई पदाचा मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्याचे नस्तीवरच आदेश दिले.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी मान्यता नाकारल्यामुळे नगरपरिषदेने तिच्या सेवा समाप्त केल्या होत्या. एवढेच नाही तर त्या जागेवर अन्य व्यक्तीची नेमणूकही केली होती. त्यामुळे नगर परिषदेकडून तिला लगेच रूजू करून घेण्याची तत्परता न दाखवता वेळ कशी मारून नेता येईल, याचाच अधिक विचार केला जात होता. त्याचप्रमाणे ज्यांची नेमणूक तिच्या सेवा समाप्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर करण्यात आली होती, ती व्यक्तीसुद्धा आपली नोकरी कशी कायम राहील यासाठी विविध अस्त्र शस्त्रांचा वापर करीत होती. शेवटी वेतन व वेतनेतर अनुदान थांबविण्यात येईल आणि त्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल असा इशारा दिला त्यानंतर नगरपरिषदेने नव्याने ठराव घेऊन तिला पुन्हा “शिपाई” पदावर रुजु करुन घेतले.
रूजू झाल्यानंतर त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव त्यानंतरच्या शिबिरात दाखल करण्यात आला. शिबिरात आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकासोबत ती महिलाही उपस्थित होती. आता सादर झालेल्या प्रस्तावात कोणतीच त्रुटी नसल्यामुळे तिच्या नियुक्तीला मान्यता प्रदान करण्यात आली. मान्यतेचा आदेश हाती पडताच तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. केसरीमल कन्या शाळेच्या ज्या हॉलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्या हॉलमध्ये हातात कागद घेऊन ती सर्वांना दाखवीत होती. ती आनंदातिरेकाने वेडी झाल्यासारखे बोलत होती. “साहब आप भगवान हो, आपने मुझे और मेरी बेटियों को पुनर्जन्म दिया है, भगवान आपको सदा सलामत रखे, मौत भी आएगी तो उसे वापस जाना पड़ेगा, आपके पैर को कांटा भी ना छुए.” तिचे धावत बाहेर जाणे, मिठाईच्या दुकानातून मिठाई घेऊन येणे आणि बडबडत माझ्यासह सर्वच उपस्थितांना मिठाई वाटणे, या सर्व बाबी विलक्षण होत्या. हृदयाचे तळापासून ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी सुद्धा मनोमन सुखावलो होतो. माझ्यासाठी सुद्धा तो अत्यंत आनंदाचा क्षण होता.
या घटनेला काही महिने लोटले होते. एके दिवशी मला “सकाळ” या वृत्तपत्राच्या वार्ताहराचा फोन आला. त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. मी त्यांना कार्यालयात येण्याबाबत सूचित केले. कार्यालयात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, आमच्या वर्तमानपत्राने दर आठवड्याला “माझ्या नोकरीतील अत्यंत आनंदाचा क्षण” असे एक सदर चालू केले आहे. आज मला त्या बाबतीत आपली मुलाखत हवी आहे. नोकरी करीत असतांना अनेक चांगले-वाईट प्रसंग येतात. काही प्रसंग विसरून जातात तर काही प्रसंग आठवणीत राहतात. वरील प्रसंग माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व माझ्या नोकरीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. मी त्याबाबत सविस्तर मुलाखत दिली. समोर बसलेली व्यक्ती एका मोठ्या वर्तमानपत्राची वार्ताहर होती. त्यांनाही या प्रसंगाविषयी कौतुक वाटत होते. वर्धा येथून पुलगाव साधारणपणे 30-35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी त्या महिलेचीही मुलाखत घेण्याचे ठरविले आणि दुसऱ्याच दिवशी पुलगाव गाठले. त्या महिलेनी आपल्यावर गुदरलेल्या घटनांच्या तपशिलासह संपूर्ण प्रकरण जसेच्या तसेच सांगितले. तोच आशिर्वाद परत-परत अत्यंत भरलेल्या अंत:करणातून ती मला माझ्या अपरोक्ष देत होती. त्या महिलेच्या भावना ऐकून वार्ताहर मंडळीही भारावून गेली होती. पुढच्या आठवड्यात माझी मुलाखत त्या भगिनीच्या प्रतिक्रियेसह वर्तमानपत्राच्या सर्व आवृत्त्यांमध्ये छापून आली. काही दिवसानंतर मा. चोक्कलिंगम साहेबांची जिल्हाधिकारी, नाशिक या पदावर बदली झाली होती. त्यांनी ती मुलाखत नाशिकच्या आवृत्तीत वाचली आणि भ्रमणध्वनीवर माझे अभिनंदन केले.
जून, 2009 मध्ये माझे स्थानांतरण वर्धा येथून शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नांदेड येथे झाले. त्यानंतर तेथून पदोन्नती झाल्यामुळे नोव्हेंबर, 2012 मध्ये शिक्षण उपसंचालक म्हणून मी अमरावती येथे रुजू झालो. अमरावती येथे कार्यरत असतांना 30 डिसेंबर, 2012 रोजी अमरावती येथून पुणे जात असतांना सुलतानपूरजवळ गाडीला अपघात झाला. माझ्या गाडीला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली आणि गाडी समोर जोरात दाबली जाऊन समोरच्या ट्रेलरमध्ये घुसली. मागून व समोरून गाडी दाबली गेली होती. गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. तीनही दरवाजे बंद झाले होते. मी मागच्या सीटवर बसलो होतो. तो एकच दरवाजा उघडता येत होता. मी गाडीतून उतरलो. त्या ड्रायव्हरला शिव्या घालत त्याची चावी घेतली. तोपर्यंत मी गाडीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यानंतर माझे लक्ष गाडीकडे गेले. गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. ते पाहून माझे हात-पाय लटलटायला लागले होते. गाडीचे एवढे नुकसान होऊनही गाडीतील एकाही व्यक्तीला साधे खरचटलेसुद्धा नव्हते. मी भानावर आलो, त्यावेळी त्या भगिनीचे शब्द आठवले, “मौत भी आयेगी, तो उसे वापस जाना होगा” “आपको कभी कांटा भी ना छू पाएगा” असे तिचे अंतःकरणाच्या तळापासून बाहेर पडलेले शब्द आज खरे ठरले. त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली होती. बाजूलाच पेट्रोल पंप होता. तेथील कर्मचारी, ग्राहक यांनी तात्काळ गर्दी केली. शिक्षण विभागाची गाडी आहे हे माहीत झाल्याबरोबर ताबडतोब 100-125 लोक जमले. काहींनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन केला. काहींनी आम्हाला तात्काळ दवाखान्यात यायचा आग्रह केला. मी ठीक होतो आणि माझ्यासोबत प्रवास करणारे सहकारी सुद्धा ठीक होते.
त्यानंतर पुन्हा बरोबर एक वर्षांनी मी त्याच वाहनाने आणि त्याच मार्गाने जात होतो, तेव्हा कारंजा (लाड) पासून 10 किलोमीटर अंतरावर “रोही” हे जंगली जनावर गाडीवर आदळले. अचानक त्याने समोरच्या काचेवर उडी मारली. काच फुटून त्याचे दोन्ही पाय स्टेरिंगच्या बाजूने आत आले व तो गाडीच्या उजव्या बाजूला धडकला आणि जोरात फेकला गेला. रोडच्या दुसऱ्या बाजूने तो जाऊन पडला. क्षणभर काय झाले हे कळलेच नाही. जणूकाही आकाशातुन एखादी जड वस्तू गाडीवर आढळल्याचा भास झाला. याहीवेळी उजव्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद झाले होते. डावीकडील दार उघडून आम्ही बाहेर पडलो. वाहन चालकासह गाडीत चार व्यक्ती होतो. रस्त्याच्या कडेला रोही 5-10 मिनिटातच मरण पावला. गाडीचेही प्रचंड नुकसान झाले. मात्र गाडीतील एकाही व्यक्तीला साधे खरचटलेसुद्धा नाही. यावेळीसुद्धा मला त्या भगिनीचे तेच शब्द पुन्हा-पुन्हा आठवत होते. अंतःकरणाच्या तळातून जे तिचे शब्द कधीकाळी बाहेर पडले होते, त्याचा मी एकदा नाही तर दोनदा अनुभव घेतला होता त्या भगिनीचे नांव होते “भगवतीताई झंझाड.”
आयुष्यात जेंव्हा जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा तेंव्हा निश्चितपणे चांगले करण्याचा प्रयत्न करा. त्याची परतफेड चांगल्याप्रकारे तुमच्या नकळत कधी ना कधी होतेच. कोणतेतरी अदृश्य हात तुमच्या मदतीला धावून येतातच, हे अनेकदा आईवडील, गुरुजन व वरिष्ठांकडून ऐकले होते, त्याची प्रत्यक्ष प्रचिती मला आली होती.
राम पवार
सेवनिवृत्त शिक्षण उपसंचालक
अमरावती
भ्रमणध्वनी :9284196496