एका बुटाची गोष्ट – भिष्मा चांदणे

एका बूटाची गोष्ट ……

आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की त्याला विनोदी म्हणायचं, सिरीयस म्हणायचं का अजून काही म्हणायचं, याचा गोंधळ होतो..

असाच एक प्रसंग माझ्या बाबतीत घडला..

शक्यतो कवी संमेलन म्हटलं की मी तिथे हजेरी लावणे टाळतो.. म्हणजे मी काही बालकवी, कुठला सूत वगैरे कॅटेगरीतला कवी नाही… इन्फॅक्ट मी कवी नाहीच.. पण होतंय काय, तिथल्या काही सुमार कवितेला निष्कारणच वाहवा…. वाहवा म्हणावं लागतं. [काही कविता चांगल्याही असतात. तो भाग वेगळा… ]

आता तुम्ही म्हणाल या वाहवेत तुमचं काय जातं? जातं ना भौ ….
त्या कवीचे पुन्हा डेरिंग वाढतं आणि वेगवेगळ्या कवितारुपी रोगर चा फवारा सतत अंगावर घ्यावा लागतो…
यावर तुम्ही म्हणाल मग बिघडलं कुठे? कुणी चुकत असेल, प्रयत्न करीत असेल तर त्याला नको का प्रोत्साहन द्यायला????

तुमचं बरोबर आहे… पण काय असतं… कविता तयार करण्याचा कुठला शिकवणी वर्ग नसतो… कविता आपल्या रक्तातच असावी लागते… ज्यांच्या रक्तातच ती नसेल तर त्यांनी वेळीच ते ओळखून कविता करणं बंद करायला हवं … पण अशाच लोकांचे कविता संग्रह निघतात, त्याला यथोचित पुरस्कार मिळतात… वगैरे… तो भाग वेगळा…

आणखी वर, मी दाढी केली या अविर्भावात ‘मी कविता केली ‘ असं ते आपल्याला सांगत सुटतात…

आता वरचं हे सारं रामायण ऐकल्यावर मी कोणी गामा समीक्षक किंवा सुप्रसिद्ध साहित्यिक वगैरे आहे हा समज कृपया मनातून काढून टाकावा.
तर मी काय सांगत होतो…
ते कवी संमेलनाचे निमंत्रण मला आले. माझे एक मार्गदर्शक मित्र मला म्हणाले, ‘ जाऊया ना सर.. तेवढेच त्यांना बरं वाटेल. बरं काही लांब नाही जायचं.. त्यानिमित्ताने बसू एकत्र . काय ? ‘ मग मी सुद्धा तिथे जायचे नक्की केले. म्हटलं नुसतं वा वा करायला आपल्या बापाचं काय जातं???
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा फरसाण बिरसान हाणू .. [ बेतानं ] आणि त्या फरसानाचे बकाने तोंडात कोंबल्यावर आजूबाजूला त्याचे भुस्काट कोणाच्या अंगावर पडणार नाही अशा बेताने वा वा, क्या बात है, जबरदस्त, आहाहा…. हे एवढे शब्द उच्चारायचे…. तसं सोप्पयं..
असा स्वार्थी विचार करून मी होकार दिला.

मग आम्ही संमेलनस्थळी डेरेदाखल झालो. बरेच कवी, कवयत्र्या आपापली हत्यारे परजून अगोदरच तिथे उपस्थित होते. साऱ्यांची तोंडे नुसती शिवशिवत होती… [ फरसाण गुलाबजामुन, जिलबीचे वेढे बघून माझे तोंड जाम खवळले…. पण हा… इतकाही मी काही लोचट नाही…. ]
बरं तिथे गेल्यावर कळलं की आयोजकांच्या साहित्यिक मुलीचा वाढदिवस आहे, त्याप्रीत्यर्थ ही मैफल [ ? ] आयोजित केलेली आहे. मग अगोदर काय घ्यायचं यावर गहन चर्चा होऊन कवितेचा एक एक राउंड घेऊयात असे ठरले….

तोपर्यंत वेगवेगळ्या मिठाईचे ॲटम अगदी हारीने मांडून ठेवण्यात आले. त्यानंतर लगेच उद्ग्घोषणा करून कवितेची फवारणी आमच्या अंगावर सुरू झाली… त्याबरोबर वा वा , बहोत खूब, माशाल्ला या उत्स्फूर्त उद्गारांनी तो हॉल दणाणून गेला.
एक कवी झाला की दुसरा… पण व्हायचं काय, तर दुसऱ्यास थोडा आग्रह करावा लागायचा… ‘ अहो म्हणा वो.. अहो घ्या हो एक रचना… मग त्याने किंवा तिने थोडेसे आढेवेढे घेऊन आपली रचना आमच्यावर नेम धरून हाणायची…. आणि मग त्या माराने आम्ही घायाळ होऊन ‘क्या बात है ‘ करीत त्याला प्रतिसाद द्यायचा…

मधूनच कोणीतरी एका नामांकित [ ? ] कवयित्रीला आग्रह केला, पण तो जरा हळू आवाजात… त्यांनी त्या आग्रहाला त्याच आवाजात, त्याच टोनमध्ये प्रतिसाद द्यावा की नाही? पण नाही, त्या जरा मोठ्याने म्हणाल्या ‘काल मला सर्दी झाली… ‘ त्याबरोबर फरसाणात गुंतलेल्या दोन चार श्रोत्यांनी वाहवा, क्या बात है ..करून टाकले..

आयला, हसावे की रडावे ते कळेना .. त्या पण कन्फ्यूज झाल्या…
‘ अहो खरोखरच मला सर्दी झाली हो त्यामुळे आवाज…… ‘
‘ क्या बात है ,जबरदस्त मॅडम … ‘
फरसाण प्रेमी अजून जोरात कोकलले… त्यातल्या त्यात जे जरा शुद्धीवर होते त्यांना काय गोंधळ झालाय तो समजला, आणि मग हास्याचा जोरदार स्फोट झाला…

कवितेचे रसपान करून तृप्त झालेल्या कवींनी मग सत्कार मूर्तींचे अभिष्टचिंतन केले. पुन्हा केकचा एक एक तुकडा साऱ्यांनी चापला आणि त्यांना पोटभर शुभेच्छा देऊन ढेकरा देत [ आता फरसाणाच्या ढेकरा कसल्या असणार? ] सारे आपापल्या घरी गेले.

आता खरी गंमत इथून सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण आठ साडे आठला मला सत्कारमूर्ती कवयित्रीचा फोन आला .. ‘अहो सर ऐका ना….. ‘
‘ ऐकतोय … ‘ मी
‘ तसं नाही हो… ऐका ना…. ‘
‘ हा हा ऐकतोय…. ‘
‘ नाही हो, आहो माझ्या पप्पांचे बूट तुमच्याकडे आलेत का? ‘
‘ म्हणजे मी नाही समजलो.. मी बावचळलो. ‘अहो कालपासून पप्पांचे बूट सापडत नाहीयेत. काल गडबडीत चुकून तुमच्या पायात आलेत का? म्हणून फोन केला आहे. ‘ अरेच्चा, आता कुठे माझ्या डोक्यात ही भानगड शिरु लागली…

म्हणजे यांच्या पप्पांचे बूट काल कुणीतरी हाणले आणि त्या मला विचारत आहेत….

माझं दुसरं मन लगेच रिऍक्ट झालं….
‘ भडव्या तुला फरसान हादडायचे होतं नाही का??? कविसंमेलन करतोय भोसडीचा…. ‘ अहो मग तिथे एखादं पायताण उरलं असेल ना? ‘
‘ हो नाहो.. ऐका ना … एक तुटकी चप्पल हाय हो ….कोणाची हाय कोणास ठाऊक.. ‘
आयला या भिकारचोट कविंच्या … साले तुटक्या चपला घालून येतात आणि चांगले बूट घालून जातात…. अन् माझ्यावर आळ ..मी मनातल्या मनात जाम शिव्या हासडल्या ..

‘हे बघा, मी काल चप्पल घालून आलो होतो. आणि तीच चप्पल घालून घरी आलोय. ‘
‘ बरं ठीक आहे.. ‘ त्यांनी फोन कट केला.

मग मी जमलेल्या कवींचा विचार करीत राहिलो. पण असला काही प्रकार करणारं त्यात कोणीच नव्हतं किंवा कोणी करू शकणार नव्हता…

दुपारपर्यंत असे फोन प्रत्येकाला आल्याचे मला समजले. मग जरा मला बरे वाटले. आयला फुकटची फाकाट बूट चोरी चा शिक्का बसतो की काय? त्यातून आपल्याला सतत बूट वापरण्याची ज्याम खाज.. बरं तेही रस्त्यावरचे… आणि असले बूट आपण वापरणार आणि त्यात हे झेंगाट मागे लागणार …मी कावलो.

त्यानंतर एक दोन दिवसांनी पप्पा रस्त्यावर भेटले. पहिल्यांदा त्यांनी माझ्या पायाकडे पाहीले आणि मग नमस्कार चमत्कार झाल्यावर म्हणाले, ‘ दीड हजाराचा बूट होता राव ..कुठून झक मारली आणि कविसंमेलन घेतलं असं झालंय… ‘ .
मग इकडून तिकडून त्यांचे सांत्वन करून मी त्यांना वाटेला लावले.
त्यानंतर हा प्रसंग संमेलनातील इतर उपस्थित कवींना, श्रोत्यांना मी सांगितला तेव्हा सारेच मोठ्याने हसले… त्यांनाही फोनवरून याप्रकारे विचारणा झालीच होती..

आता नाही म्हटलं तरी या घटनेला नऊ-दहा वर्षे झाली असतील, पण आता हे सांगण्याचा मुद्दा म्हणजे काल-परवा करमाळ्यात मला पप्पा भेटले. माझ्या पायात नवे बूट होते. पप्पांनी पहिल्यांदा त्या बुटाकडे पाहिले आणि उत्स्फूर्त म्हणाले, ‘ नवे आहेत वाटतं?? ‘
मी म्हणणार होतो ढापलेत… पण म्हणालो हो…

आता बोला…
तात्पर्य……… तुम्हीच शोधून काढा…

भीष्मा चांदणे
988 1174 988

Leave a comment